कोट्यातील गुणांपासून यंदा खेळाडू मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:37+5:302021-02-11T04:15:37+5:30
जळगाव निंबायती : दरवर्षी विविध क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्यासह प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना दहावी व ...
जळगाव निंबायती : दरवर्षी विविध क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्यासह प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना दहावी व बारावी परीक्षेत क्रीडा क्षेत्रातील कोट्यातील वाढीव २५ गुण दिले जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे २० मार्चपासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्याने कोणत्याच मैदानी क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदाच्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मिळणाऱ्या हक्काच्या गुणांपासून विद्यार्थी मुकणार आहेत.
राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक ६ मधील तरतुदीनुसार विविध ११ खेळ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना वाढीव गुण दिले जातात. मात्र, त्यासाठी त्यांना जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रकारात सहभाग घेणे आवश्यक असते. अशा खेळाडूंना दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ५ ते २५ पर्यंत वाढीव गुण दिले जातात. दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ गुण तर, राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना २० वाढीव गुण दिले जातात. त्याबाबतचे प्रस्ताव विभागीय परीक्षा मंडळाकडे मुदतीत सादर करणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे परीक्षा मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत संपली असली तरी, अद्याप एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील मिळणाऱ्या हक्काच्या वाढीव गुणांपासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोट...
विद्यालयातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून आमच्या विद्यालयाचे नाव क्रीडाक्षेत्रात राज्यभर गाजलेले आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या विद्यालयाच्या करुणा गाढे या विद्यार्थिनीने भारोत्तलनात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, वर्षभरात क्रीडा स्पर्धा न झाल्याने प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी विद्यालयातील क्रीडा क्षेत्रातील वाढीव गुणांचे प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविता आले नाही.
- पी. एन. पवार, प्राचार्य, जळगाव निंबायती