लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सुख-समृध्दीची मनोकामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 07:02 PM2018-11-07T19:02:54+5:302018-11-07T19:11:58+5:30
नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले होते.
नाशिक : आश्विन वद्य अमावस्येच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लक्ष्मीपूजन करुन दीपोत्सवाचा जल्लोष केला. बुधवारी (दि.७) संध्याकाळी पहिला मुहूर्तापासून रात्री अखेरच्या मुहूर्तापर्यंत नागरिकांनी घरे, दुकानांमध्ये पारंपरिक पध्दतीने लक्ष्मीचे पूजन करुन सुख-समृध्दीची मनोकामना केली. आपल्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराची भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या
दीपोत्सवाचा प्रारंभ तसा वसुबारसपासून होतो. वसूबारस ते भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरक चर्तुदशी साजरी केल्यानंतर बुधवारी पहाटे नाशिककरांनी अभ्यंगस्नान करत देवपूजा आटोपली.आश्विन वद्य अमावस्येची समाप्ती बुधवारी रात्री साडे नऊ वाजता झाली. तत्पुर्वी संध्याकाळी ठिकठिकाणी शहरासह उपनगरांमध्ये लक्ष्मीपूजनाची लगबग होती. घरे दुकानांपुढे स्वच्छता करुन महिलावर्ग रांगोळी काढण्यात दंग होता तर पुरूष वर्गाकडून आकर्षक सजावट केली जात होती. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले उमटविण्यात आली तर घरे, दुकानांच्या द्वारावर झेंडूची तोरण लावण्यात आली. तसेच लक्ष्मीपूजनाप्रसंगी लाह्या, बत्तासेचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच सुहासिनींकडून घरातील वाहनांचेही औंक्षण करण्यात आले. तसेच दागदागिण्यांची पूजा करण्यात आली. संध्याकाळी पावणेसातचा मुहूर्तावर शहरातील व्यावसायिकांकडून शरणपूररोड, कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड आदि भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिवसभरात लक्ष्मी, कुबेर, विष्णू आदि देवतांचा पूजाविधी पार पडला. चौरंगावर अक्षदांचे अष्टदल कमल किंवा स्वास्तिकाचे चिन्ह काढत त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तसेच नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले होते. कुबेराकडेही धनप्राप्तीची प्रार्थना करत गायीच्या दूधापासून तयार करण्यात आलेला खव्याचा नैवेद्यासह धने, गुळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदिंचा प्रसाद लक्ष्मीला अर्पण करण्यात आला.
आकशकंदील-दिवाळीचे अतुट नाते
फटाका आणि दीपोत्सव असे समीकरण जोडण्याऐवजी आकाशकंदील आणि दिवाळीचे अतुट नाते नागरिकांनी लक्षात घेत घरोघरी तसे दुकानांवरही आकशकंदील प्रकाशमान केले. दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव असल्याने घरांच्या उंबरठ्यावर तसेच दुकानांपुढे काढलेल्या रांगोळ्यांवर पणत्या प्रज्वलित करुन सुवासिनींकडून प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला. शहरात रंगीबेरंगी आकर्षक आकाशकंदील यानिमित्ताने पहावयास मिळाले. आकाशातील झगमगणा-या चांदण्यावरून ही कल्पना पुढे आली असावी.