वडाळागावाच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 10:16 PM2021-01-28T22:16:27+5:302021-01-29T00:44:27+5:30
नाशिक : वडाळागाव चौफुलीपासून तर थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा वडाळागावातील मुख्य वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे.
नाशिक : वडाळागाव चौफुलीपासून तर थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा वडाळागावातील मुख्य वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उखडलेले डांबर यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वडाळागावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले असले तरीदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ----
वडाळारोडवर लॉन्सचालकांचे अतिक्रमण
नाशिक : वडाळारोडवर विविध लॉन्स असून बहुतांश लॉन्सचालकांकडून पार्किंगकरिता जागा सोडली नसल्यामुळे लग्नसोहळे या लॉन्समध्ये पार पडत असताना वऱ्हाडींची वाहने थेट वडाळा मुख्य रस्त्यावर उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा सिग्नलपासून तर थेट रहनुमा उर्दू शाळेपर्यंत विविध लॉन्स आहेत. या लॉन्समध्ये सातत्याने विवाह सोहळे असतात आणि वाहतुकीचा खोळंबा दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशोका सिग्नलवर हवे झेब्रा पट्टे
नाशिक : अशोकामार्गावरील सिग्नलवर झेब्रा पट्टे, स्टॉप लाइन नसल्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियम पायदळी तुडविले जात आहेत. झेब्रा पट्टे नसल्याने वाहनचालक थेट वाहने पुढे आणून उभी करतात. यामुळे येथून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. महापौरांचा हा प्रभाग असून सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे, तरीदेखील महापालिकेकडून शहराचे प्रथम नागरिक असलेल्या लोकप्रतिनिधींच्याच प्रभागातील अती महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.