पाथर्डीफाटा येथे एटीएम फोडण्याचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 01:17 AM2020-09-22T01:17:49+5:302020-09-22T01:18:12+5:30
पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दिनेश पाटील व किसन गिधाडे हे रात्रीच्या गस्तीवर होते. पाथर्डी फाटा येथील अॅक्सिस बँकेचे एटीएमजवळ असलेले क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास गेले असता त्यावेळी एटीएममधून दोन संशयित इसम त्यांना पाहून पळाले. यामुळे बीट मार्शल यांनी एटीएममध्ये जाऊन बघितले असता एटीएम यंत्राची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर व पोलीस कंट्रोल रुमला माहिती कळवून अधिक मदत मागितली. संबंधित संशयित आरोपींचा बीट मार्शलने पाठलाग सुरू केला. तोपर्यंत इंदिरानगर गुन्हे शोध पथकसुद्धा संशयित आरोपींच्या मागावर लागले होते. त्यावेळी वासननगर येथील एका गार्डनलगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या आडोशाला एक संशयित लपल्याचे लक्षात येताच त्यास ताब्यात घेतले.
त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख, संदीप लांडे, जावेद खान आदींनी परिसरात शोध घेत त्या संशयित आरोपीचे साथीदार आरोपी रूपेश शिवाजी कहार (२१, अंबड) यास खाकीचा हिसका दाखवून विचारपूस केली असता त्याने उर्वरित चार संशयित आरोपींची नावे सांगितले. अवघ्या दीड तासात त्या संशयित चार मुलांना ताब्यात घेतले.