बँकेची फसवणूक करण्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:05+5:302021-07-15T04:12:05+5:30

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूबिका जॉन साठे (३३, रा. नारायणबापू नगर नाशिकरोड) या महिलेने दि. नाशिक जिल्हा महिला ...

The plot to defraud the bank was foiled | बँकेची फसवणूक करण्याचा डाव उधळला

बँकेची फसवणूक करण्याचा डाव उधळला

Next

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूबिका जॉन साठे (३३, रा. नारायणबापू नगर नाशिकरोड) या महिलेने दि. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक, शाखा वडाळा नाका यांचेकडून इंडिका कार विकत घेण्यासाठी ५ लाख ६८हजार २६२ रुपये घेतले होते. त्यानुसार त्यांनी इंडिका कार(क्रमांक एम एच १५ एफ व्ही १२०७) विकत घेतली. परंतु गाडीचा हप्ता भरत नसल्याने बँकेने महाराष्ट्र राज्य संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडून जप्तीचे आदेश घेतले. त्यानुसार बँकेचे वसुली अधिकारी सदर महिलेच्या घरी वारंवार गेले असता त्या महिलेकडे गाडी आढळून आली नाही तसेच हप्ता भरण्यासही सहकार्य केले नाही. त्यामुळे बँकेने सदर महिलेस जामीनदार असलेल्या व्यक्तींच्या पगारातून हप्ता वसूल करण्याचे आदेश घेऊन कार्यवाहीस सुरुवात केली. जामिनदारांच्या पगारातून बँकेचे हप्ते कपात होऊ लागल्याने जामिनदारांनी जिल्हा पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन गाडीचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार तपासाअंती सदर महिलेने आपली इंडिका कार परस्पर एका इसमास गहाण देऊन बँकेची व सदर गाडी घेणाऱ्या इसमाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास विश्वनाथ लाड यांची दि.१ जुलै रोजी सरकारी वाहनावर वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल पानसरे यांच्यासह गस्त ड्युटी होती. आंबेडकर पुतळा ते रेल्वे टेशन भागातील एटीएम व बँक चेक करत असताना गाडी (क्रमांक एम एच १५ व्ही एफ १२०७) ओरिएन्टल बँक ते एल डी पी बँक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी सदर गाडी थांबून गाडीतील इसमांकडे विचारपूस केली असता त्यांच्या बोलण्यात सत्यता आढळून न आल्याने व त्यांच्याकडे नमूद गाडीबाबत काहीही कागदपत्र आढळून न आल्याने सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणली.

इन्फो

आरटीओ ॲपवरून मालकाचा शोध

संबंधित इसमांना गाडीचे कागदपत्र आणण्यास सांगितले असता त्यांनी कागदपत्रे हजर न केल्याने पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आरटीओ ॲपवरून सदर गाडीचे मूळ मालकाचा पत्ता शोधला असता सदर गाडीचे आरसी बुकवर दि. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि. नाशिकची नोंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बँकेशी संपर्क करून त्यांना बोलावून घेऊन चौकशी केली असता सदर घटनेचा उलगडा झाला. कायदेशीर बाबी पूर्ण करून घेऊन कर्जदाराने बँकेस फसवण्याचा व गाडी परस्पर गहाण ठेवून फसविण्याचा कट उधळून लावला. पोलिसांनी सदर गाडी कर्जदारासमक्ष बँकेच्या स्वाधीन केली.

Web Title: The plot to defraud the bank was foiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.