सिपेट प्रकल्पासाठी गोवर्धन शिवारातील भूखंड निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:56+5:302021-06-21T04:10:56+5:30
नाशिक : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नाशिकमध्ये प्रस्तावित ...
नाशिक : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नाशिकमध्ये प्रस्तावित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सिपेट) शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या केंद्राला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी गोवर्धन शिवारातील भूखंड निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, प्रतिवर्ष दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण असून, या बेरोजगार तरुणांना शिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याची गरज असल्याची मागणी अंबड, सातपूर, गोंदे, मुसळगाव, माळेगाव आदी औद्योगिक वसाहतींमधील कंपनी, तसेच उद्योजकांकडून सतत होत आली आहे. अखेर उद्योजकांची ही मागणी सिपेटच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याने नाशिकमधील उद्योगांना कौशल्यनिपुण मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी सिपेटची असलेली आवश्यकता शासनाच्या लक्षात आणून देत या प्रकल्पासाठी हेमंत गोडसे यांनी सातपूरजवळील गोवर्धन शिवार, नाशिक तालुक्यातील शिंदे आणि सय्यद पिंप्री शिवारातील उपयुक्त शासकीय जागाही सुचविल्या होत्या. यातील गोवर्धन शिवारातील जागा निश्चित झाली असून, अखेर सिपेट उभारणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
इन्फो-
जागा हस्तांतरणाचा आदेश
राज्य शासानाच्या उद्योग विभागाने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेसाठी (सिपेट) सातपूरजवळील गोवर्धन शिवारातील शासकीय भूखंड निश्चित केला आहे. याविषयीचे पत्र राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सहसचिव रवींद्र गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले असून, गोवर्धन शिवारातील सर्व्हे नं. ३३ मधील १२.३३ हेक्टर आर इतकी जागा सिपेटकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश दिला आहे.
कोट-
सिपेट प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था जिल्ह्यातील तरुणांसाठी एक वरदानच ठरणार आहे. उद्योग विभागाच्या या निर्णयामुळे प्रस्तावित सिपेटचे केंद्र सुरू झाल्यानंतर प्रतिवर्ष सुमारे दोन हजार तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार आहे.
-हेमंत गोडसे, खासदार, नाशिक