खोटी माहिती देऊन प्लॉट विक्र ी
By admin | Published: August 6, 2016 12:02 AM2016-08-06T00:02:21+5:302016-08-06T00:02:21+5:30
सटाणा : एनए परवानगी रद्द; अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; प्लॉटधारकांचे पळाले तोंडचे पाणी
सटाणा : शहरातील मालेगाव रोडवरील सर्व्हे नंबर ३८१ चे जनरल मुखत्यार पत्र तयार करून खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांना तब्बल २७ प्लॉटची विक्री करून मालेगाव येथील व्यापाऱ्याने पाच कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या भूखंडाची बिनशेती परवानगी रद्द केल्याने लाखो रुपये मोजून प्लॉट खरेदी केलेल्या प्लॉटधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जागेचा लेआऊट अस्तित्वात नसताना जमीनमालकाने प्लॉट खरेदी-विक्र ीचा व्यवहार करून त्यावर विविध बँकांकडून एक कोटीहून अधिक कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे. या गैरव्यवहारामुळे शासनाच्या अटी- शर्तींचा भंग झाल्याने या भूखंडाला दिलेल्या बिनशेती परवानगी रद्द करावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता विजय भांगडिया यांनी तहसील कार्यालयासमोर तब्बल पाच दिवस आमरण उपोषण केले होते. भांगडिया यांच्या उपोषणाची दखल घेत सबंधित विभागाने सखोल चौकशी करून भांगडिया यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी हा निर्णय दिला आहे.
सबंधित प्लॉट खरेदीदारांनी देखील व्यवहाराच्या मूळ किमतीपेक्षा नाममात्र रकमेत प्लॉट खरेदी केल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात केली असल्याने खरेदीदारांची भूमिकादेखील तळ्यात मळ्यात असल्याचे बोलले जात आहे. सर्व्हे नंबर ३८१/१ च्या नऊ हजार तीनशे चौरस मीटर क्षेत्राचे निवासासाठी २७ जानेवारी २००९ मध्ये शासनाच्या अटी शर्तीना अधीन राहून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बिनशेतीला परवानगी दिली होती. परंतु सहा वर्ष उलटूनही अटी-शर्तीनुसार भूखंड विकसित करण्यात आलेला नव्हता. मात्र भूखंडधारकाने तात्पुरत्या लेआऊट परवानगीचा गैरफायदा घेऊन लेआऊट अस्तित्वात नसताना २८ पैकी २२ प्लॉट विक्री करु न गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहारात तलाठ्यासह दुय्यम निबंधक चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना अपर जिल्हाधिकाऱ््यांनी बिनशेती परवानगीच रद्द केल्याने तत्कालीन तलाठी आणि दुय्यम निबंधक यांच्याही अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.