नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 07:43 PM2021-09-18T19:43:49+5:302021-09-18T19:48:07+5:30
पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक : वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१मध्ये समाविष्ट आणि राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील कॉलेजरोड-महात्मानगर परिसरातील एका पेट स्टोरमध्ये उघडकीस आला आहे. शनिवारी (दि.१८) नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून संशयित दुकानमालकाला ताब्यात घेतले. तसेच विक्रीसाठी ठेवलेले शेकरू सुरक्षित रेस्क्यु केले.
वन्यजीवांची तस्करी कायद्याने अजामीनपात्र असा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कॉलेजरोड परिसरातील सौरव एक्झॉस्टिक व ॲक्वेटिक पेट स्टोर नावाच्या दुकानात पुर्ण वाढ झालेले सुमारे तीन ते चार वर्षे वयाचा शेकरु हा वन्यप्राणी विक्रीसाठी पिंजऱ्यात बंदिस्त करुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्यासमक्ष शिताफीने दुकानावर छापा टाकला. यावेळी शेकरुला रेस्क्यु करण्यात आले तसेच दुकानमालक संशयित आरोपी सौरव रमेश गोलाईत (२३,रा.दसक, जेलरोड) यास वनविभागाच्या कारवाई पथकाने ताब्यात घेतले आहे.सदाहरित किंवा निमसदाहरीत वनात आढळणारा अत्यंत लाजाळु असा वन्यप्राणी म्हणून शेकरुची ओळख आहे. काळानुरुप जंगलांचा होणारा ऱ्हास या वन्यप्राण्याच्या जीवावर उठला असताना आता तस्करांनीही या जीवाकडे वक्रदृष्टी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेकरु वन्यजीव अत्यंत चपळ व तितकेच लाजाळू असतानाही विक्रीसाठी संशयिताने त्यास कसे व कोणाच्या मदतीने आणि कोठून जेरबंद केले? हा मोठा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात वनविभागाला कसोशिने खोलवर तपास करावा लागणार आहे, कारण शेकरु या वन्यजीवाची तस्करी होणे ही धक्कादायक बाब आहे.