पाट पाणीप्रश्नी दिशाभूल
By admin | Published: August 28, 2016 10:13 PM2016-08-28T22:13:47+5:302016-08-28T22:14:49+5:30
येवला : कालवा कृती समितीच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया
येवला : तालुक्याच्या दुष्काळग्रस्त उत्तर-पूर्व भागातील शेतीसाठी नियोजित मांजरपाडा पाटपाण्याच्या प्रश्नात राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असल्याने हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी अजून किती वर्षे लागतील, असा संतप्त सवाल पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. शासनाने तृषार्त जनतेचा अधिक अंत न बघता तत्काळ धरणाचे व कालव्याचे काम सुरू करावे अन्यथा संतप्त येवलेकर तीव्र जनआंदोलन छेडतील, असा इशारा शनिवारी (दि. २७) दुपारी येवला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत देण्यात आला.
यावेळी दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बद्रीनाथ कोल्हे बैठकीत बोलताना म्हणाले की, पुणेगाव धरणाचे पाणी दरसवाडी धरणापर्यंत चाचणी घेण्यात येणार असल्याचे श्रेय तालुक्यातील काही लोकांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाटण्याचे काम चालविले आहे. एका दिवसात उपोषण करून प्रश्न सुटणार होता तर गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न हाती सत्ता असताना का मार्गी लावला नाही, असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या कामास तृतीय सुधारित मान्यता देऊन तत्काळ काम सुरू करण्यात यावे अन्यथा आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
संजय मिस्तरी यांनी सांगितले की, तालुक्यात पाणी येणार म्हणून लोकांनी गाजावाजा केला, प्रसिद्धीसाठी बातम्या दिल्या. ही गोष्ट जनतेची दिशाभूल करणारी आहे.
मांजरपाडा प्रकल्पाला गती द्यावी अशी मागणी मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळांनी केली होती. त्यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे अधिवेशन बैठकीत जाहीर केले होते. मात्र दोन वर्षं होऊनही कोणताच निर्णय झाला नसल्याची खंत प्रा. सुदाम भालेराव यांनी व्यक्त केली.
यापूर्वीचे ओझरखेडनंतरचे पुणेगाव व आत्ताचे मांजरपाडा अशा नामकरणात चाळीस वर्षांचा कालखंड लोटला तरी प्रश्न मार्गी लागत नसल्याने लाभक्षेत्रातील जनतेच्या भावना तीव्र बनल्या आहेत. पाटपाणी प्रश्नाला गती मिळावी. दुष्काळी परिस्थितीत प्रश्नाला वाचा फोडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम चाळीस वर्षे येथील पुढाऱ्यांनी केले आहे, असा आरोप सभेत करण्यात आला. रामा घोडके म्हणाले की, ३० वर्षांतील अकार्यक्षम नेतृत्वाने हा पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. मांजरपाडा धरण, बोगदा, वळण बंधारे व कॅनॉलच्या कामात बरीच अपूर्तता आहे. झालेल्या कामावरील खर्च झालेला निधी व अपूर्ण कामाची टक्केवारी व लागणारा पैसा व कालावधी याबाबत माहिती लपविली जात आहे. त्यामुळे पाटपाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरीवर्गाचा शासनाने आता अंत पाहू नये, अशी अपेक्षा घोडके यांनी व्यक्त केली.
दुष्काळी येवले तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळवून द्यायचे असेल तर तीव्र संघर्षाशिवाय पर्याय नाही, असा सूर या बैठकीतून निघाला. बैठकीस दादा पाटील, दिनकर लोहकरे, जगन भोसले, श्रावण देवरे, प्रकाश जानराव, विठ्ठल बोरसे, संजय सोमासे, विठ्ठल दारुंटे, गोरख भालेराव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)