साहित्य संमेलनासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:19 AM2019-05-28T01:19:34+5:302019-05-28T01:19:50+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची आयोजनाची व यजमानपदाची जबाबदारी घेण्यास सावाना सक्षम आहे, अशा आशयाचे निवेदन महामंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.
सावानाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे जाऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना आगामी साहित्य संमेलन ऐतिहासिक व सांस्कृतिक नाशिकनगरीत घेण्यात यावे, याबाबतचे साकडे घालण्यात आले. यासंबंधी निवेदन ढाले पाटील यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, सार्वजनिक वाचनालय ही संस्था नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत संस्था असून, तिला १७९ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. केवळ महाराष्टÑातील नव्हे तर भारतातील राजकीय, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील कलाकार मंडळींनी सावानाला भेट दिली आहे.
पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम आदी महनीय व्यक्तींनी सावानाला भेट दिली असून, कार्याचे कौतुक केले आहे. सावानाकडे दीड लाखांच्या वर ग्रंथसंपदा असून, वाचनालयाचे सुसज्ज मुक्तदार, अभ्यासिका, सुसज्ज नाट्यगृह आणि तीन प्रशस्त सभागृह आहेत. तसेच वाचनालयातर्फे दरवर्षी ग्रंथ मेळावा, सावाना जिल्हा साहित्यिक मेळावा आदींसह विविध सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात, त्यामुळे नाशिक येथे इ.स. २०२० मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन घेऊन आयोजनाची जबाबदारी सावानाला द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जागा निश्चितीसाठी नाशिकला येऊन सोयीची जागा ठरवावी, वाचनालय अपेक्षित खर्च, कार्यकर्ते, धोरण याबाबत संपूर्ण सक्षम आहेत. त्यामुळे साहित्य संमेलन नाशिक येथे भरविण्याचा आणि साहित्यिकांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंबंधीच्या पत्रकावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक व नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सांस्कृतिक कार्य सचिव प्रा. डॉ. वेदश्री थिगळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
अग्रक्रमाने विचार व्हावा
२०२० मध्ये आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाबाबत नाशिकचा अग्रक्रमाने विचार व्हावा. यापूर्वी २००४ मध्ये नाशिक येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. त्यात सावानाचे पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले होते, असेही या संबंधीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.