पैसे खाली पडल्याचे सांगून नागरिकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:40 AM2018-10-17T00:40:35+5:302018-10-17T00:41:14+5:30
अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोरट्यांनी चोरी केली आहे़ पोलिसांनी साध्या वेशात या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे़
नाशिक : अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोरट्यांनी चोरी केली आहे़ पोलिसांनी साध्या वेशात या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे़ पुणे येथील मात्र सद्यस्थितीत पंचवटी परिसरातील रहिवासी मानसी मोरे या सोमवारी (दि़१५) दुपारी कामानिमित्त महात्मा गांधी रोड परिसरात आल्या होत्या़ त्या आयटेन कारमध्ये (एमएच १५, ईपी ०९५७ ) बसलेल्या असताना एका संशयिताने कारच्या दरवाजाजवळ पैसे पडल्याचे सांगितले़ पैसे घेण्यासाठी मोरे खाली उतरल्या असता कारमधील त्यांची पर्स चोरट्यांनी चोरून नेली़ या पर्समध्ये ३० हजार रुपयांची रोकड, मोबाइल, ड्रायव्हिंग लायसन, अॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड, घड्याळ व पॅनकार्ड असा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घाण पडल्याचे सांगून मोबाइलची चोरी
जेलरोड परिसरातील नवरंग कॉलनीतील रहिवासी रमेश ताजनपुरे हे शनिवारी (दि़१३) सायंकाळी सीएनपी प्रेससमोर भाजी खरेदीसाठी गेले होते़ यावेळी दोन संशयितांपैकी एकाने खाद्यावर घाण पडल्याचे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले़ तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कारमधून पाउण लाखाचा ऐवज लंपास
पुणे रोडवरील हॉटेल क्वालिटी इनच्या पार्किंगमधील उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडून चोरट्यांनी पाउण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़१५) घडली़ चोरी गेलेल्या ऐवजामध्ये लॅपटॉप जीओचा डोंगल, इतर कागदपत्रे, तीन चेक असा ७२ हजार ५८८ रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे़ या प्रकरणी संतोष स्वामी (रा़ हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कालिका यात्रेत मोबाइलची चोरी
कालिका मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सचिन चिंचले (रा़ अमृतधाम, पंचवटी) या इसमाचा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
स्नानासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
गोदापात्रात स्नानासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ मनोज ऊर्फ गोट्या बाळासाहेब दवंगे (३३, रा. कामगारनगर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास मनोज आसारामबापू पुलाजवळील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता़ मात्र, पोहत असताना बुडून त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दुचाकीची चोरी
सिडकोच्या शिवपुरी चौकातील रहिवासी ऋषिकेश सोनवणे यांची ४० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५ जीजी ४६१३) चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली़ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
दुचाकी चोरट्यास अटक
४ अशोकस्तंभ परिसरातून शहर गुन्हे शाखेने एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे़ साहिल दिलावर शेख (२०, रा. भगूर) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. ढोल्या गणपती मंदिराजवळील परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या शेखची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली़ त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीची (एमएच १५, सीपी २२५१) दुचाकी जप्त केली आहे़