जिल्हा परिषदांच्या कामांसाठी यापुढे पीएमएस प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:55 AM2019-06-14T00:55:48+5:302019-06-14T00:57:48+5:30
जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या फाईलींचा प्रवास टाळण्याबरोबरच पेपरलेस कारभार व ठेकेदारांची देयके अदा करण्यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या फाईलींचा प्रवास टाळण्याबरोबरच पेपरलेस कारभार व ठेकेदारांची देयके अदा करण्यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. या प्रणालीच्या माध्यमातूनच १ एप्रिल २०१९ पासून सर्व विभागांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधून अदा करण्यात येणार असून, तशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व बांधकाम सभापतींच्या हस्ते बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग तसेच पाणीपुरवठा विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे सांगून गिते यांनी, राज्याने या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्णाची निवड केली होती त्यानुसार जिल्ह्णात प्रायोगिक तत्त्वावर अंगणवाडींच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्णातील बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार आहे. विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून, विनाविलंब देयक अदा करता येणार आहे. शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग व लघुपाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधील संगणीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली आहे. या सिस्टीममध्ये कोणत्या अभियंत्याने माहिती भरली त्याची माहिती समाविष्ट करणे, संबंधित अभियंत्याने माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेत चिटकविणे, त्यानंतर शाईने प्रिंट आऊटवर चारही बाजूने तिरप्या रेषा मारून सांक्षाकित करणे, प्रत्येक पानावर अभियंत्याने स्वाक्षरी करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो सर्वप्रथम सिस्टीमवरच करावा, शाईने करू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.