कवीने सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना मांडाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:52 PM2020-02-01T22:52:54+5:302020-02-02T00:15:08+5:30
काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव बसवंत : काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.
येथील मविप्र समाजाच्या क. का. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे सभापती माणिक बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, संचालक सचिन पिंगळे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास मोरे, प्रतापदादा मोरे, उल्हास मोरे, प्रवीण लभडे, कवी संदीप जगताप, कैलास सलादे, गुलाब मोरे, नामदेव मोरे, अशोक मोरे, चेतन मोरे, उपप्राचार्य डी. डब्लू. दाते आदी उपस्थित होते. प्राचार्य दरेकर यांनी प्रास्ताविक केले. गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कवी पुरी यांनी आपल्या गाजलेल्या काटा व प्रेमाचा झांगडगुत्ता या कवितांमधून देशातील सध्याच्या विदारक परिस्थितीवर कोरडे ओढले. राजकारणामुळे सामान्याची अवस्था कशी चोथ्यासारखी झाले ते मार्मीकतेने दाखवून दिले. आज जिव्हाळ्याची नाती बदलली आहेत. नात्यांमधील पावित्र्य जपले पाहिजे. तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आदर्श घडला तरच अन्याय-अत्याचार थांबतील. माणूस ज्या गोष्टीची दक्षता घेत नाही त्या लुप्त होतात. त्यामुळे आपल्या भावना जपल्या पाहिजेत, असेही नारायण पुरी म्हणाले. ज्ञानोबा ढगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. बी. बी. पेखळे यांनी क्रीडा अहवाल वाचन केले. साहेबराव मोरे, ग्रंथपाल मेहंदळे यांनी पारितोषिक यादीचे वाचन केले. प्रा. शोभा डहाळे, अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. जे. पाटील यांनी आभार मानले.