कविता आत्म्याचा स्वर असते : तन्वी अमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 01:28 AM2022-04-11T01:28:56+5:302022-04-11T01:29:19+5:30
व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.
नाशिक : व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.
तन्वी अमित लिखित व शब्दमल्हार प्रकाशित ‘आवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
रविवारी (दि. १०) कुसुमाग्रज स्मारकात पार पडले. या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या प्रकाशन समारंभ पियू शिरवाडकर, पीयूष नाशिककर, जाई सराफ, स्वानंद बेदरकर यांच्या काव्य वाचनाने तन्वी अमित यांच्या कवितेचे पदर उलगडत गेले. उपस्थित कवितांना नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
तन्वी अमित म्हणाल्या, कवयित्रीच्या कविता आत्मकथन करणाऱ्याच असतात. त्यामुळे सर्व भाषांतील साहित्यात स्त्रीत्वाच्या हरळीची मुळे पसरलेली आहेत. कविता ही आत्मस्वराची प्रक्रिया असून, त्यांच्यामुळे आपल्याला स्वर मिळतो. कवीने स्वत:च्या मनाचा तळ शोधल्यास वाचकांच्या मनाचा तळ मिळतो. स्वानंद बेदरकर यांनी सादर केलेल्या ‘गुंता’ कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.