कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन
By Admin | Published: February 4, 2015 02:01 AM2015-02-04T02:01:07+5:302015-02-04T02:01:31+5:30
कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन
नाशिक : येथील ज्येष्ठ कवयित्री जयश्री पाठक (६०) यांचे पुणे येथे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती राम पाठक, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. छंदोबद्धता हे पाठक यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते. ‘चंद्रकोर’ व ‘अनुकार’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर अन्य दोन बालसंग्रह प्रसिद्ध आहेत. पैकी ‘चंद्रकोर’ला प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांची प्रस्तावना लाभली आहे. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने होणाऱ्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सावानाच्या बालभवन समितीच्या त्या सदस्य होत्या. अर्चना जोगळेकर व स्मिता आपटे यांच्या साथीने त्या ‘बहिणाईच्या बहिणी’ हा कार्यक्रम सादर करीत. त्यात त्या मराठी स्त्री कवितेचा समग्र आढावा घेत असत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहित्य रसिका मंडळाच्याही त्या अध्यक्ष होत्या. अनेक पुरस्कारही त्यांना लाभले होते. त्यांच्या निधनाने संवेदनशील कवयित्री हरपल्याची भावना शहरातील साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.