साधुग्रामसाठी जागासंपादन ठरणार कळीचा मुद्दा

By admin | Published: July 26, 2014 12:00 AM2014-07-26T00:00:58+5:302014-07-26T00:48:42+5:30

दशरथ पाटील : साधू-महंतांसह शेतकऱ्यांनाही विश्वासात घेण्याची गरज

The point of the key to becoming a Sadhugram is to make space | साधुग्रामसाठी जागासंपादन ठरणार कळीचा मुद्दा

साधुग्रामसाठी जागासंपादन ठरणार कळीचा मुद्दा

Next

नाशिक : मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात ध्वज उतरेपर्यंत शासनाकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा केली जात होती, यंदा तर प्रत्यक्ष कामे सुरूहोण्यापूर्वीच महापालिकेकडे २२२ कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. दुर्दैवाने, नजरेत भरेल असे एकही काम दिसत नाही. मागील सिंहस्थात ५७ एकर जागा साधुग्रामसाठी कायमस्वरुपी खरेदी करण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त २८६ एकर जागा संपादित करण्यात आलेली होती. महापालिकेने आगामी कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त जागेबाबत अद्याप कुठलीही हालचाल केलेली नाही. ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरविला जातो त्या साधू-महंतांना विश्वासात घेऊन जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडविला नाही तर कुंभमेळ्यात बिकट परिस्थिती ओढवण्याची भीती माजी महापौर दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापालिकेचे प्रतिनिधित्व करणारे दशरथ पाटील यांनी सन २००३-०४ मध्ये झालेल्या आणि आता अवघ्या ११ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याविषयी आपली मते परखडपणे, पण अभ्यासपूर्ण मांडली. पाटील यांनी सांगितले, मागील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५० कोटींचा विकास आराखडा होता. त्यातून महापालिकेच्या वाट्याला ६८ कोटी रुपये आले. सर्वप्रथम साधुग्रामसाठी तपोवनातील लक्ष्मीनारायण ट्रस्टची ५७ एकर जागा १४ कोटी रुपये खर्चून संपादित करण्यात आली. उर्वरित १६७ एकर जागा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात संपादित केली. याव्यतिरिक्त पांजरापोळची ४७ एकर, स्वामीनारायण ट्रस्टसमोरील ४५ एकर जागाही तात्पुरत्या स्वरूपात संपादित करण्यात आली. ३० एकर जागा वारकरी संप्रदायासाठी मिळविली. सुमारे ३२४ एकर जागा संपादित करत जागेचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. अर्थात शेतकरी आणि साधू-महंत यांना विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडविला गेला होता. पाणीपुरवठ्याबाबत थेट पाइपलाइन योजनेच्या माध्यमातून तीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. गोदावरीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी ३५० कि.मी. भूमिगत गटारयोजना राबविण्यात आली. गोदावरी कृती योजनेच्या माध्यमातून ट्रंकसिव्हर योजना राबविली गेली. पाच मलनिस्सारण केंद्रे उभारली गेली. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. सिंहस्थात येणारी वाहतूक लक्षात घेता २२ रिंगरोडची निर्मिती करण्यात आली. गोदावरी, वालदेवी व नासर्डी या नद्यांवर एकूण २२ पूल उभारले. दोन पुलांना समांतर अशा पुलाची निर्मिती झाली. नाशिकरोडला उड्डाणपूलही उभा राहिला. शहरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी १०५ सुलभ शौचालये बांधण्यात आली. ध्वजारोहणापूर्वी तीन-चार महिने अगोदरपासूनच साधुग्राममध्ये ४५० निवाराशेड्स उभी राहिली. मोठ्या आखाड्यांसाठी मोठ्या तंबूंची सोय करण्यात आली. साधुग्राममध्ये कच्चे रस्ते तसेच पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महापालिकेने ही सारी कामे शासनाकडून पुरेसा निधी मिळाला नसतानाही हिंमतीवर पूर्ण केली होती. राज्यात कॉँग्रेसचे सरकार तर मी सेना-भाजपाचा महापौर अशी स्थिती असतानाही कधी संघर्ष करत, तर कधी समन्वय-समजुतीने निधी पदरात पाडून घेण्यात आला.
आता महापालिकेकडे सुमारे २२२ कोटी रुपयांचा निधी आलेला आहे; परंतु नजरेत भरतील अशी कामे दिसून येत नाहीत. मागील कुंभात संपादित केलेल्या ५७ एकर जागेच्या भरवशावरच ही मंडळी बसून आहेत. अतिरिक्त जागेबाबत कसलीही हालचाल दिसून येत नाही. आगामी कुंभमेळ्यात जागेचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. जागेबाबत शेतकऱ्यांकडे बोट दाखविले जाते परंतु दहशत माजवून हा प्रश्न सुटणारा नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात या जागा संपादित केल्या जाणार असल्याचे त्यांना पटवून द्यावे लागणार आहे. साधुग्रामसाठी जागेचा प्रश्न लवकर मिटला नाही, तर मोठी बिकट स्थिती निर्माण होऊ शकते, असा धोक्याचा इशाराही पाटील यांनी दिला.
साधू-महंतांना बाजूला ठेवून सिंहस्थाचे नियोजन करता येणार नाही. साधू-महंतांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांचा आदर केला गेला नाही तर कुंभमेळा कागदावरच राहील. आता जुन्याच रिंगरोडची डागडुजी करण्याची कामे सुरु आहेत; परंतु वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवीन रस्त्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शहराबाहेरून वाहतूक वळविणारी व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. आवश्यक त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांना तातडीने चालना दिली पाहिजे. १९९१ मध्ये झालेल्या सिंहस्थात महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यावेळी शासनाने ९१ कोटी रुपयांचा निधी दिला होता. २००३ च्या कुंभाला ६८ कोटी रुपये निधी आला. निधी आला नाही म्हणून रडत बसण्याऐवजी लढण्याचीच भूमिका ठेवली. साधू-महंतांसह नाशिककरांना विश्वासात घेऊन कामे होत गेल्याने त्यावेळी कुंभमेळ्याबरोबरच खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाचीही पर्वणी साधली गेल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: The point of the key to becoming a Sadhugram is to make space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.