सटाणा येथे ट्रकसह पोकलॅँड, रॉक ब्रेकर जळून खाक
By admin | Published: March 12, 2016 11:16 PM2016-03-12T23:16:26+5:302016-03-12T23:20:55+5:30
सटाणा येथे ट्रकसह पोकलॅँड, रॉक ब्रेकर जळून खाक
सटाणा : महावितरणच्या गलथान कारभारामुळे लोंबकळत असलेल्या मुख्य वीजवाहिनीच्या तारांचा ट्रकवरील पोकलॅँड मशीनला धक्का लागून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात पोकलॅँड, ट्रक, रॉक ब्रेकर जळून खाक होऊन सुमारे ९५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत सुदैवाने जीवितहानी टळली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील सटाणा-रावळगाव रस्त्यावरील देवळाणेनजीक घडली.
नामपूर येथील शिवाजी सूर्यवंशी यांच्या दहाचाकी मालट्रकमधून (क्र. एमएच ४१ जी ७०५५) संजय भटू देवरे (रा. महड, ता. बागलाण) यांच्या मालकीचे पोकलॅँड व रॉक ब्रेकर मशीन सुराणेहून सटाण्याकडे येत होते. देवळाणे-सुराणेदरम्यान लोंबकळत असलेल्या तारांना पोकलॅँडचा धक्का लागून शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे पोकलॅँडने पेट घेतला. तत्पूर्वी विद्युतप्रवाह उतरलेल्या ट्रकमधून ट्रकचालक व अन्य तिघांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पोकलॅँड, रॉकब्रेकर व ट्रकला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले व त्यात ५५ लाखांचे पोकलॅँड, २५ लाखांचा ट्रक आणि १५ लाखांचे रॉक ब्रेकर आगीमध्ये भस्मसात झाले.
शॉर्टसर्किट होऊन ट्रक व पोकलॅँडला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला कळविल्यावर सनपाचा अग्निशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाला. मात्र अग्निशमन बंबात केवळ चार हजार लिटर पाणी असल्याने पहिल्या फेरीत आग आटोक्यात येऊ शकली नाही. अखेर दुसऱ्या फेरीसाठी सारदे येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवर अग्निशमन बंब नेण्यात आला. मात्र इंधन संपल्याने अग्निशमन बंब बंद पडला आणि आग विझविण्यासाठी पाणी मिळविण्याची धावपळ करणाऱ्यांना अग्निशमन बंबाच्या इंधनासाठी डिझेल पंपावर धाव घ्यावी लागली. तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पोकलॅँड, ट्रक व रॉक ब्रेकरची राख झाली होती.
घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता भाऊलाल नागरे, लाईनमन डी. टी. निकम, नितीन बच्छाव, नरेंद्र बच्छाव हजर झाले होते. त्यांनीही मुख्य वाहिनीच्या तारा जमिनीपासून खूप कमी अंतरावर असल्याचा दुजोरा दिला.