नांदगावी पोळ्याच्या आदल्या रात्रीच ‘सर्जा’ चोरीला
By Suyog.joshi | Published: August 26, 2022 08:08 PM2022-08-26T20:08:20+5:302022-08-26T20:10:13+5:30
यासंदर्भात बोलताना, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे चोरीला आळा बसू शकेल, असे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी म्हटले आहे.
नांदगाव (नाशिक) - ऐन पोळ्याच्या आदल्या रात्री पाच वर्षांचा बैल चोरी गेल्याने मूळडोंगरीचे शेतकरी तुकाराम गोविंद मोरे व्यथित झाले असून, त्यांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोळ्याच्या आदल्या दिवशी माळ्यावर ठेवलेले साजशृंगार गळ्यातली घुंगरू माळ, गोंडे, माथुटी काढले आणि सकाळी बैल गेला. हे समजल्यावर तुकाराम यांचे वडील गोविंदबाबाना टेन्शन येऊन त्यांना डॉक्टरकडे न्यावे लागले. तुकाराम मोरे हे हाडाचे शेतकरी असून घरच्या गाईपासून झालेला गोऱ्हा त्यांनी जीव लावून वाढवला होता. त्याला जोडी नव्हती म्हणून तीन वर्षांपूर्वी सर्जा बैल विकत घेतला. गेली अडीच वर्षे दोघा बैलांच्या जीवावर शेती फुलली, याची आठवण येऊन त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
पोळ्याला सर्जा पैठण्याची जोडी गेली तीन वर्षे घरच्या महिलांनी बनविलेली पुरणपोळी गोडधोड खात होती. अतिशय प्रेमाने त्यांच्यासाठी स्वयंपाक केला जात होता. याची आठवण येऊन घरातील महिलांच्या डोळ्यांतसुद्धा अश्रू तरळत होते.
चोरट्यांचा डाव दोन्ही बैलांना घेऊन पळण्याचा असावा. पण कुत्रे भुंकले म्हणून ते पळून गेले असावे, असा तुकाराम यांचा कयास आहे. कुत्रे भुंकण्याचा आवाज रात्री दोनच्या सुमारास आला होता. पण रात्री अधूनमधून कुत्रा भुंकतो म्हणून दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.
पोलिसात तक्रार दिल्यावर तुकाराम यांनी साकोरे पेट्रोल पंप, अन्नपूर्णा दुकान येथील सीसीटीव्हीने घेतलेली छायाचित्रे बघितली. त्यात त्यांना रात्री २ वा.च्या सुमारास उभे असलेले छोटा हत्ती हे वाहन दिसले. काल (शुक्रवार) सायंकाळी एकट्या सर्जाला ओवाळताना घरातील महिला अत्यंत भावनिक झाल्या होत्या. एक वर्षांपूर्वी समाधान सर्जेराव मोरे व शेतकरी बाळू चव्हाण या शेतकऱ्यांचे बैल चोरीला गेले होते.
यासंदर्भात बोलताना, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे चोरीला आळा बसू शकेल, असे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी म्हटले आहे.