१५० वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
By admin | Published: June 3, 2016 11:01 PM2016-06-03T23:01:04+5:302016-06-03T23:01:34+5:30
१५० वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
सिडको : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत रस्त्यात व पार्किंग नसलेल्या जागेत वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी, चारचाकी कार व रिक्षा मिळून सुमारे १५० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करीत २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील यांच्या आदेशान्वये सिडको भागात मोहीम हाती घेण्यात आली. यात जे भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यातच बसून आपला व्यवसाय थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात अशा व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय न करता आपल्याला दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व त्यांच्या टीमचे कर्मचारी किरण निकम, मयूर पवार, अनिल गाढवे यांनी थेट संपर्क साधून त्यांना आवाहन केले. या आवाहनास विक्रेत्यांनीही प्रतिसाद देत स्वत:हून आपली दुकाने मागे घेतली. यापाठोपाठ पोलिसांनी जे वाहनचालक सिग्नलजवळ थांबताना आपली वाहने झेब्रा क्रॉसिंग पट्ट्याच्या पुढे उभी करतात, अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा चारचाकी, दुचाकी व रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)