पोलीस प्रशासन सज्ज : तिहेरी तलाक विधेयकाविरुध्द शनिवारी मुस्लीम महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:09 PM2018-03-29T23:09:54+5:302018-03-29T23:09:54+5:30
शहरातील मुस्लीम समाजाने एकत्र येत शरियत बचाव समिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पदाधिका-यांसोबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर (गुन्हे), सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, सुनील नंदवाळकर यांनी चर्चा केली.
नाशिक : केंद्र सरकारकडून तिहेरी तलाकविरुद्ध विधेयक मंजुरीचा प्रयत्न केला जात असताना हा प्रयत्न मुस्लीम समाजाच्या इस्लामी शरियतमध्ये मोठा हस्तक्षेप करणारा असल्याचे सांगत शरियत बचाव समितीने मुस्लीम महिलांच्या मूक मोर्चाची हाक दिली आहे. शनिवारी (दि.३१) निघणाऱ्या मोर्चाच्या मार्गाची पाहणी गुुरुवारी (दि.२९) पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली.
शहरातील मुस्लीम समाजाने एकत्र येत शरियत बचाव समिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पदाधिका-यांसोबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर (गुन्हे), सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, सुनील नंदवाळकर यांनी चर्चा केली. पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. बडी दर्गा पिंजारघाट येथून मोर्चाला दुपारी प्रारंभ केला जाणार आहे. पिंजारघाट हा अत्यंत तीव्र उताराचा व अरुं द रस्ता आहे. यामुळे कु ठल्याही प्रकारे मोर्चेक-यांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मोर्चाच्या मार्गाला जोडणारे सर्व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अजय देवरे यांनी यावेळी दिली. शनिवारी दुपारी दीड वाजेपासून जुने नाशिककडे येणारे मार्ग बंद करण्यात येतील, असे ते म्हणाले. बडी दर्गा ते ईदगाह मैदानापर्यंत दीड किलोमीटरचा मोर्चाचा मार्ग आहे. हा संपूर्ण मार्ग बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून पाहणी केली जाणार आहे.
ईदगाहवर मैदानावर सभा
मोर्चाचा समारोप ईदगाह मैदानावर होणार असून, याप्रसंगी सभा घेतली जाणार आहे. सभेमध्ये व मोर्चात पुरुषांचा कुठलाही सहभाग राहणार नाही, असे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सभेमध्ये मुस्लीम महिला धर्मगुरू तिहेरी तलाक संकल्पना आणि केंद्राकडून सादर केले जाणारे तिहेरीतलाकविरुद्ध विधेयकाबाबत माहिती देण्यात येणार आहे.