पोलीस-प्रशासनाने सुरू केले जनप्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:07 PM2020-03-24T23:07:59+5:302020-03-25T00:16:43+5:30
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र व राज्य सरकार चिंतित असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे हाच त्यावरील एकमेव उपाय ...
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र व राज्य सरकार चिंतित असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे हाच त्यावरील एकमेव उपाय असला तरी, गेल्या काही दिवसांपासून नागरिकच त्याविषयी बेफिकिरीने वागत असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संचारबंदी व कायद्याचा वापर करूनही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलीस व प्रशासनाने जनतेचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कुठे हात जोडून तर कोठे विनंती करून घरीच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
नाशिक शहरात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नसला तरी, संशयित रुग्ण म्हणून गेल्या आठ दिवसांत जवळपास ४२ जणांना रुग्णालयात दाखल करून उपचाराअंति घरी सोडून देण्यात आले आहे ही समाधानकारक बाब असली तरी, कोरोना व्हायरसचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव त्याची लक्षणे आढळण्यास लागणारा विलंब पाहता, कोणत्याही नागरिकाने गाफील राहता कामा नये, अशी परिस्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना गर्दी टाळण्याचा व घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसे झाल्यावरच कोरोनाची साखळी तोडता येणे शक्य आहे.
शासनाच्या या आवाहनाला समाजातील काही घटकांकडून प्रतिसादही मिळत असला तरी, अद्यापही अनेकांना या गंभीर संभाव्य संकटाची भीती वाटत नाही. त्यामुळे पोलिसांकडून लोखंडी बॅरिकेट््स लावून रस्ते बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी संपर्क कक्ष
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन वापरास व वाहतुकीस मनाई करण्यात आली असली तरी, पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांच्याशी निगडित आस्थापनांमध्ये कामकाज करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र त्यांना कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने संपर्क कक्ष तयार केला आहे. त्यासाठी अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली असून, नागरिकांना समस्या उद्भवल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क अधिकारी
नियंत्रण कक्ष- १००, ०२५३२३०५२३३, ३४
सीताराम कोल्हे- ९८२३७८८०७७
रघुनाथ शेगर- ९९२१२१६५७७
दीपक गिरमे- ८६५२२२४१४०
समाधान वाघ- ८८८८८०५१००
लॉकडाउनच्या घोषणेमुळे काहीजणांचा असा समज झाला आहे की, सर्व सेवा बंद होणार आहेत की काय? परंतु कर्फ्यूच्या दरम्यानही सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतात. जनता कर्फ्यूच्या दिवशी तसेच राज्यात लागू असलेल्या १४४च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या जीवनावश्यक बाबी तशाच सुरू राहणार असल्याने कुणीही अजिबात घाबरू नये.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
नागरिकांनी केवळ वैद्यकीय कारण किंवा अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असून, नागरिकांनी संचारबंदीबाबत निष्काळजीपणा दाखविल्यास पोलीस प्रशासनाला नियमानुसार कारवाई करावी लागणार असल्याचे लक्षात ठेवावे.
- विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त
वृत्तपत्रेही अत्यावश्यक सेवेतच...
कोरोनाबाबत सोशल मीडियावरून व्हायरल होणाºया चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे तसेच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे हेच विश्वासार्ह व अचूक माहिती देणारे प्रभावी साधन असल्याने वृत्तपत्रांचा लॉकडाउनच्या स्थितीत अत्यावश्यक सेवेत समावेश केला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह शासन-प्रशासनाने वेळोवेळी तशी स्पष्टता केली आहे. त्यामुळे वाचकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.