सराईत गुन्हेगार जया दिवेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By Admin | Published: July 14, 2017 01:20 AM2017-07-14T01:20:53+5:302017-07-14T01:21:10+5:30
पंचवटी : सुनील वाघ व हेमंत वाघ भावंडांवर हल्ला करत खुनामध्ये सहभाग गुन्ह्यात जया दिवे मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : हनुमानवाडीमधील भेळविक्री करणाऱ्या सुनील वाघ व हेमंत वाघ या दोघा सख्ख्या भावंडांवर हल्ला करत सुनील वाघ यांची हत्या तसेच दिंडोरीरोडवरील रहिवासी मंगेश पाटील या विक्रे त्याच्या खुनामध्ये सहभाग व गोळीबार, मोक्का आदिंसह विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला जया दिवे ऊर्फ जेडीच्या अखेर मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
मालेगाव स्टँड परिसरात गुरुवारी (दि.१३) दुपारी दिवे येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे परिसरात सकाळपासूनच गुन्हे शोध पथकाचे साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिवे हा मालेगाव स्टँडवर असलेल्या सिद्धी टॉवरच्या इमारतीमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी इमारतीला वेढा दिला. दिवे निसटून जाऊ नये, याची पूर्ण तजवीज पोलिसांनी केली. पोलिसांनी शिताफीने दिवेला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.दिवेकडून विविध गुन्हे उघडकीस येणार असून, फरार गुन्हेगारांची माहिती उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दिवे याने आतापर्यंत चार खून केले असून, परिसरात गोळीबार करून दहशत पसरविणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला, खंडणी वसुली, असे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोलिसांना तो हवा होता. त्याच्या मागावर तसेच गुप्त बातमीदारांमार्फत सातत्याने पोलीस चाचपणी करत होते.