नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 02:04 AM2022-01-01T02:04:02+5:302022-01-01T02:04:24+5:30
शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले. नववर्षाच्या उत्साहात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांनी तळीरामांवर करडी नजर ठेवतानाच प्रत्येक संशयास्पद वाहनांचीही तपासणी केली.
नाशिक : शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले. नववर्षाच्या उत्साहात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांनी तळीरामांवर करडी नजर ठेवतानाच प्रत्येक संशयास्पद वाहनांचीही तपासणी केली.
शहर वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांच्या नेतृत्वात शहरातील ठिकठिकाणच्या नाक्यांसह वर्दळीच्या रस्त्यांवर ५ पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक, २ एपीआय यांच्यासह सुमारे ८० ते ९० वाहतूक पोलीस तैनात केले होते. पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. नाशिक शहरात ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जुन्या वर्षाला निरोप देणारे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारे नागरिक रस्त्यावर उतरून जल्लोष करतात. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या जल्लोषावर विरजण पडले होते. यावर्षीही कोरोना प्रतिबंधात्मक नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आल्याने शहरातील जल्लोष करणाऱ्या तरुणाईची संस्था काही प्रमाणात मर्यादित दिसत असली तरी पोलिसांनी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. रात्री ९ वाजेनंतर शहरात काटेकोरपणे जमावबंदीची अंमलबजावणी करीत शहरातील मुंबई नाका, सारडा सर्कल, कॉलेजरोड, गंगापूररोड, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, भद्रकाली भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसून आला.
होमगार्ड, राखीव दलही तैनात
नाशिक शहरातील वाहतूक पोलिसांवर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ताण निर्माण होऊ नये तसेच टवाळखोर अथवा मद्यपींकडून कायदा सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारे बाधा निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांचाही मोठा फौज फाटा रस्त्यावर दिसून आला. यात राज्य राखीव दलासह होमगार्डचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
दुकानांवरही कारवाई
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीच्या मूडमध्ये असलेल्या नागरिकांनी खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, पावभाजी स्टॉल अशा काही ठिकाणी गर्दी केली होती. मात्र महापालिका अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत मास्क न व वापरणाऱ्या आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारून कारवाई केली.