पोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:29 PM2017-08-17T18:29:51+5:302017-08-17T18:30:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : गंगापूररोडवरील पोलीस वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वसाहतीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, थंडीताप, सांधेदुखी, सर्दी, घसादुखीचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे वसाहतीतील अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात डेंग्यू आजारावर उपचार घेत असून, लहान मुलांपासून ते कर्मचाºयांपर्यंत अनेकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
पोलीस वसाहतीत गेल्या पंधरवड्यापासून चार ते पाच नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने काहींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेली असल्याने या भागात मनपा प्रशासन तसेच संबंधित प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे असले तरी अद्यापपावेतो कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. प्रभागाच्या नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप पोलीस कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस वसाहतीत शेकडो पोलीस कर्मचारी राहात आहेत. परिसरात दैनंदिन साफसफाई होत नाहीच याशिवाय मोकाट जनावरांचा संचार वाढलेला आहे. परिसरातील काही घरांचे व इमारतींचे ड्रेनेज चोकअप झाल्याने सांडपाणी साचून राहते, त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याशिवाय परिसरात गाजरगवत वाढलेले असल्याने औषध फवारणीदेखील होत नसल्याची तक्रार पोलीस कर्मचाºयांनी केली आहे. नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीस कुटुंबीयच सध्या डेंग्यूसदृश आजाराच्या विळख्यात सापडल्याने त्यांची सुरक्षा करणार कोण, असा सवाल खुद्द पोलीस कर्मचाºयांनी केला आहे.
वसाहतीच्या मागील बाजूस प्रचंड घाण साचलेली आहे तर मोकळ्या जागांवर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. संपूर्ण वसाहतीत डुकरांचा उपद्रव वाढला आहे. पोलीस वसाहत इमारतीच्या मागील बाजूस कचराकुंडी झालेली आहे तर पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळच दुर्गंधीयुक्त डबके आणि घाणीचे साम्राज्य आहे. पोलीस कर्मचाºयांनी स्वत: अनेकदा तक्रार केलेली आहे. मात्र पोलीस प्रशासनच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.