पोलीस चौकीचा झाला कायापालट
By admin | Published: December 20, 2015 10:39 PM2015-12-20T22:39:08+5:302015-12-20T22:41:49+5:30
जिल्हा रुग्णालय : कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर
नाशिक : शहरात वा जिल्ह्यात कोठेही खून, हाणामारी, अपघात यांसारख्या घटनांनंतर सर्वाधिक व सर्वप्रथम दबाव असतो तो जिल्हा रुग्णालय व तेथील पोलीस चौकीमध्ये. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर लागलीच, घटनेची माहिती देण्यासाठी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ना फोनची व्यवस्था होती, ना वायरलेस यंत्रणेची.मात्र, काही दिवसांपूर्वी पोलीस उपआयुक्त विजय पाटील जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यापुढे कर्मचाऱ्यांची गैरसोय मांडली अन् पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पोलीस चौकीचा कायापालट झाला आहे़
जिल्हा रुग्णालयात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण होते़ अशावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून जादा पोलीस कुमक मागविणे, अपघातात जखमी झालेल्या व उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची संबंधित पोलीस ठाण्यास एमएलसी (मेडिकल लिगल केस) कळविणे, अशा एक ना अनेक कारणांसाठी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:चा मोबाइल अथवा जिल्हा रुग्णालयाच्या फोनचा सहारा घ्यावा लागत होता़
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पोलीस उपआयुक्त विजय पाटील हे जिल्हा रुग्णालयात कामानिमित्त आले होते़ त्यांना पत्रकारांनी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांची गैरसोय तसेच संपर्क यंत्रणेबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वत: चौकीत येऊन पाहणी केली़ यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चौकीची रंगरंगोटी, तसेच संपर्कासाठी वायरलेस सेटही देण्यात आला़ मात्र सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या टेलिफोन सुविधेबाबत पाटील यांनी पुढाकर घेऊन शनिवारी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत दूरध्वनी सेवा (क्रमांक -०२५३ - २३१४५८६) उपलब्ध करून दिली़
जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीसमोर अस्ताव्यस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांचा अडथळा दूर करण्यासाठी बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे़ यामुळे एका अर्थाने पोलीस चौकीने मोकळा श्वास घेतला आहे़ गत कित्येक वर्षांपासून पोलीस कर्मचारी चौकीत असुविधा असूनही कर्तव्य करीत होते़ पोलीस उपआयुक्त पाटील यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर तत्काळ सुविधाही उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत सद्य:स्थितीत सकाळी व रात्रपाळीत प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी काम करीत असून, यामध्ये वाढ करण्याची तसेच पोलिसांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची नितांत आवश्यकता असून, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ (प्रतिनिधी)