नवीन मोटार वाहन कायद्याबाबत पोलिसांनी झळकविले फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:45 PM2019-09-04T13:45:26+5:302019-09-04T13:47:36+5:30
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपविल्यास आणि दुर्दैवाने त्याच्याकडून अपघात घडल्यास संबंधित मुलाच्या पालकांना....
नाशिक : शहर वाहतूक शाखेकडून नवीन मोटार वाहन सुधारित कायद्याविषयक जनजागृती करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरूवात करण्यात आली. बुधवारी (दि.४) आडगाव येथील क.का.वाघ महाविद्यालयाजवळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जनजागृतीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. नवीन मोटार वाहन कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये अशाप्रकारे फलक उभारले जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
मोटार वाहन कायद्यात नव्याने काही तरतुदी करण्यात आल्या असून, या कायद्याची अंमलबजावणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पुर्वी नाशिककरांमध्ये याविषयी जागरूकता यावी, यासाठी प्रबोधनपर फलक उभारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून वाहनचालक वाहतूक नियमांचे अधिकाधिक पालन करण्यावर भर देतील, हा यामागील उद्देश आहे. ‘वाहतूक नियमांचे पालन करा, आपले पैसे वाचवा, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर आहे’ असा संदेश आणि दंडाच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपविल्यास आणि दुर्दैवाने त्याच्याकडून अपघात घडल्यास संबंधित मुलाच्या पालकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. तसेच आपत्कालीन स्थितीत धावणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाला रस्ता मोकळा करून न दिल्यास १० हजारांचा दंडदेखील पोलिसांकडून केला जाऊ शकतो. नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये काही तरतुदींनुसार शिक्षा कडक करण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतदेखील वाढ झाली असून, या कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटीफिकेशन शहर वाहतूक शाखा लवकरच जाहीर करणार आहे. तत्पुर्वी फलक याबाबत जनजागृतीसाठी फलक उभारले जात आहेत तसेच नादुरुस्त वाहने रस्त्यावर आणल्यास त्या इसमालाही १० हजारांचा दंड पोलिसांकडून केला जाऊ शकतो. बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटविल्यास सदर चालकावर पोलिसांकडून कारवाई करत दोन हजारांपर्यंतचा दंड वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे आता यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. फलक अनावरणप्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांच्यासह वाहूतक पोलीस, विद्यार्थी उपस्थित होते.