पोलीस आयुक्तांकडून तक्रारदाराची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:19 AM2019-06-21T01:19:43+5:302019-06-21T01:20:00+5:30
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली.
इंदिरानगर : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली.
बुधवार (दि १९) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वत: वाहन चालवित इंदिरानगर पोलीस ठाण्यात सरप्राइज व्हिजीट दिली. पोलीस आयुक्त आल्याचे पाहून पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यात येताच स्वच्छता बघून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी तेथे तक्रार देण्यासाठी आलेल्या युवतीला जवळ बोलावून ‘काय झाले.. कुठे झाले.. घाबरू नको मला सांग, तुझी तक्रार घेतली’ अशी विचारपूस केली. सदर युवतीने झालेली घटना कथन केली व माझी तक्रार घेतली असल्याचे सांगितले.
यावेळी ठाणे अंमलदाराच्या खुर्चीवर गणवेश परिधान करून बसलेल्या महिला पोलीस कर्मचारी व्ही. एस. पाचोरे यांना आयुक्त म्हणाले ‘तुम्ही ज्येष्ठ असूनसुद्धा गणवेश परिधान केला आहे, कारण ज्येष्ठ महिला साडीवर असतात, मला बरे वाटले’ असे म्हणून पाचोरे यांना बक्षीस जाहीर केले.
सुमारे पंधरा मिनिटांत भेट दिल्यानंतर बीट मार्शल यांना समवेत घेऊन परिसरातील सुमारे ४० क्यूआर कोडची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी उपस्थित होते.