विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:49 AM2019-02-26T01:49:40+5:302019-02-26T01:49:59+5:30
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती.
नाशिक : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती. त्यांच्या रिक्त पदावर कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात होते. सोमवारी (दि.२५) या दोन्ही चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले. गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती आणि पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे-पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारतील.
डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन अधीक्षक म्हणून राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची उपमहानिरीक्षकपदी (वस्तू व सेवा कर) विक्रीकर विभागात पदोन्नतीने बदली झाली आहे. जळगावचे माजी पोलीस अधीक्षक दत्ता कराळे हे ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी कोणाची वर्णी लागली, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.