पोलीस आयुक्तांना तक्रारीची प्रतीक्षा
By admin | Published: February 9, 2016 11:04 PM2016-02-09T23:04:00+5:302016-02-09T23:04:30+5:30
पोलीस आयुक्तांना तक्रारीची प्रतीक्षा
नाशिक : सराईत गुन्हेगारांसोबत एकाच व्यासपीठावर बसून ‘पोलीस स्थापना दिवस’ साजरा करणे, दंडवसुलीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची गचांडी पकडून सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणे, चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून जबर मारहाण करणे यांसारखी कृत्ये करूनही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून अभय दिले जाते़ याचे कारण म्हणजे पोलीस आयुक्तांच्या लेखी नागरिकांच्या या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी नाहीत़ कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक तक्रार करणार कसे हा प्रश्नच आहे़
पोलीस आयुक्तालयात बदलीनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली़ काही महिने होत नाही तोच उपनगरला तडकाफडकी बदली केली जाते़ उपनगरला तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते़ मात्र पुन्हा इंदिरानगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती होते़ सराईत गुन्हेगारांसोबत पोलीस रेझिंग डेचा कार्यक्रम, पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या महिलेसोबत असभ्य भाषेत बोलणे, शाळकरी मुलास मारहाण केली जाते़ विशेष म्हणजे महिला असभ्य वर्तनप्रकरणी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणीही केली होती़
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत केवळ बेशिस्त वाहतूकदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रस्त्यावर उतरावे लागते़ कारण या ठिकाणी गुन्हेच घडत नसल्याने तपासाचे कामच नाही़ वास्तविक पाहता २०१५ चे निम्म्याहून अधिक गुन्ह्यांची उकल झालेली नाही़ या ठिकाणी अवैधपणे ‘स्पा’ व्यवसाय सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्तांनी मारलेल्या छाप्यामुळे समोर आले होते़ याचाच अर्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किती कर्तव्यदक्षपणे काम करीत आहेत याची कल्पना यावी़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात बोलावून एका युवकास जबर मारहाण केल्यानंतर त्यास पोलिसांविषयी काही तक्रार नसल्याचा जबाब लिहून घेतल्याचा कारनामाही पोलिसांनी केला आहे़ सामान्य पोलीस कर्मचाऱ्याविषयी तक्रार आल्यानंतर निलंबनाची कारवाई करणारे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारीची वाट पाहतात, हे अनाकलनीय असल्याची चर्चा आहे़ (प्रतिनिधी)