५ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:11 PM2020-09-10T21:11:21+5:302020-09-10T21:12:11+5:30
संशयित लाचखोर मल्ले हे गळाला लागल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या वर्तुळात त्यांचे विविधप्रकारचे ‘किस्से’ चर्चिले जात होते.
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगारमालाचे दुकान सुरू करण्यासाठी तक्रारदार व्यावसायिकाकडे पाच हजारांची मागणी करत लाचेची तेवढी रक्कम स्वीकारताना या पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले संशयित हवालदार भास्कर दामोदर मल्ले (५२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवारी (दि.१०) अटक केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, एका ३२ वर्षीय भंगार व्यावसायिकाला पोलीस ठाणे हद्दीत दुकान सुरू ठेवण्यासाठी मल्ले याने तक्रारदार व्यापाऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. बोलणी झाल्यानुसार गुरुवारी मल्ले याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपअधीक्षक सुनील पाटील, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर, राजेंद्र गिते, शरद हेंबाडे आदींनी शिताफीने मल्ले यास रंगेहात ताब्यात घेतले. मल्लेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत. संशयित लाचखोर मल्ले हे गळाला लागल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या वर्तुळात त्यांचे विविधप्रकारचे ‘किस्से’ चर्चिले जात होते. गुरुवारी ते रजेवर असताना लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी गेले होते. पोलीस ठाण्यांमध्ये चालणारे चिरीमिरीचे गुपचूप व्यवहार सर्वश्रुत आहे; मात्र आयुक्तालय हद्दीत पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक सुधारण्यासाठी व कारभार पारदर्शक करण्याकरिता नवनियुक्त आयुक्त दीपक पाण्डेय यांना अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.