संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांनी उगारला दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:21 PM2020-03-24T17:21:55+5:302020-03-24T17:22:46+5:30
मालेगाव : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सातही पुलांवर नाकाबंदी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात पोलीसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडुका उगारला. जबाबदार नागरिकांकडून संचारबंदीचे उल्लंघन केले जात असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. शेवटी प्रशासनाला कायद्याचा धाक दाखवावा लागला. त्यानंतर दुपारहून शहरातील रस्ते ओस पडले होते.
राज्यात कोरोनाने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर महसुल, पोलीस, महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सकाळी १० वाजता आरोग्य सेवेचा आढावा घेत येथील महापालिकेच्या प्रभाग क्र. १ च्या कार्यालय लगतच्या मलेरीया विभागाला भेट देऊन डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच भाजपाचे गटनेते सुनिल गायकवाड, मदन गायकवाड यांनी शेतकºयांकडून फवारणी ट्रॅक्टर मागवून कलेक्टरपट्टा, कृषीनगर परिसरात औषधांची फवारणी केली. सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. पोलीसांनी मोसमपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सामान्य रुग्णालय पुल, रामसेतू पुल आदी परिसरात नाकाबंदी केली होती. कॅम्पकडे जाणा-या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. असे असतानाही विनाकारण नागरिक घराबाहेर पडत होते. सकाळच्या सत्रात वाहतूक शाखेच्या पोलीसांनी विनाकारण घराबाहेर पडणा-यांना चांगलाच चोप दिला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी रस्त्यावरुन गस्त घालत विनाकारण गर्दी करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. सायंकाळपर्यंत पोलीस रस्त्यावर दिसून आले. नागरिकांना जबाबदारीचे भान नसल्याचे दिसून आले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खबरदारीचा उपाय म्हणून गावातील दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील टेहरे, मुंगसे, दाभाडी, सौंदाणे, झोडगे, करंजगव्हाण, रावळगाव, वडनेर, खाकुर्डी, निमगाव, निंबायती, जळगाव निं. अजंग, वडेल आदी मोठ्या गावांसह लहान गावांमधील व्यवहार ठप्प झाले होते. शेती शिवारातील कामकाजही बंद ठेवण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीवर अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, रत्नाकर नवले, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी नियंत्रण ठेवून होते.