महिला अत्याचाराविरोधात पोलिसांची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:42+5:302021-01-08T04:44:42+5:30
शहरात महिला अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अल्पवयीन मुलींचे फूस लावून अपहरण करणे, विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक छळ, मारहाण, छेडछाड यांसारख्या ...
शहरात महिला अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अल्पवयीन मुलींचे फूस लावून अपहरण करणे, विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक छळ, मारहाण, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांवर आता पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी व पीडितांना जलद न्याय मिळावा, या हेतूने शहर पोलिसांनी वर्षअखेरीस विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अपहरण, विनयभंग, बलात्कार, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांपैकी ७४ गुन्ह्यांचा तपास करून संशयित आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच १८ वर्षांच्या पुढील ७० बेपत्ता महिलांचा शोध घेत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत दिली.
--इन्फो--
सात पोलीस ठाण्यांना विशेष ‘टास्क’
सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ‘टास्क’ संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता.
--इन्फो--
रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला अखेर ‘मुहूर्त’
पोलिसांनी तपास करून रखडलेले अपहरणाचे १४, विनयभंग- २०, बलात्काराचे ३ व विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी दाखल असलेल्या ३७ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात यश मिळविले, तसेच महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या २९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २३३ अकस्मात मृत्यू, १ हजार ७२ तक्रार अर्ज, २६६ प्रलंबित मुद्देमाल निर्गती व ५०४ इतर गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले.
--इन्फो--
या महिला पोलिसांचा गौरव
सहायक निरीक्षक उमा गवळी, उपनिरीक्षक सी. एस. पाटील, जयश्री अनवणे, प्रियंका गायकवाड, योगिता कोकाटे, चांदनी पाटील, अनिता पाटील, हवालदार पार्वती राठोड, क्षितिजा रेड्डी, सरला घोलप, ललिता वाघ, जयश्री कांगणे, शुभांगी आवारे, रीना आहेर, सोनाली वडारकर यांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.