‘त्या’ मद्यपी कारचालकासह साथीदाराला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:40 PM2020-04-28T22:40:24+5:302020-04-28T22:59:28+5:30
नाशिक : पोलिसांची नाकाबंदी तोडून मद्यसाठ्यासह पळ काढणाऱ्या दोघा संशयित युवकांना न्यायालयाने येत्या बुधवार (दि.२९)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
नाशिक : पोलिसांची नाकाबंदी तोडून मद्यसाठ्यासह पळ काढणाऱ्या दोघा संशयित युवकांना न्यायालयाने येत्या बुधवार (दि.२९)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर विलास जाधव (२४, रा. पांगरे मळा, सिडको), मोतीराम चिंतामण शेवरे (२०, रा. शिवशक्ती चौक) अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी (दि.२५) सायंकाळी गंगापूर गावाकडून शहराच्या दिशेने इंडिका कार (एमएच ०४, बीएस ३८८१) येत होती. गंगापूर पोलिसांनी गंगापूर गावातील नाकाबंदीच्या ठिकाणी ही कार अडवली व विचारपूस केली. पोलिसांनी डिक्की उघडण्यास सांगितले असता दोघा संशयितांनी कारसह पळ काढला. यावेळी संशयितांनी त्यांच्याकडील कार गंगापूर, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळवून ठिकठिकाणची बॅरिकेडिंगला
धडक दिली. तसेच महिंद्रा सर्कल येथे नीलेश ठाकरे या व्यक्तीसही त्यांनी धडक दिल्याने तो जखमी झाला.
अखेर दोघांनाही पांगरे मळा परिसरात शहर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे मद्याच्या २५ बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी सागर आणि मोतीराम विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही रविवारी (दि.२६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.