अपहरणानंतर हत्त्या केल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेवकाला पोलीस कोठडी
By Admin | Published: May 27, 2017 03:18 PM2017-05-27T15:18:09+5:302017-05-27T17:08:00+5:30
न्यायालयासमोर संशयित नगरसेवक हेमंत शेटटी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी, राकेश कोष्टी यांना प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी एम.के.पिंगळे यांनी येत्या १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नाशिक : येथील भाजपाच्या नगरसेवकाला एका गुन्हेगाराच्या अपहरणाचा कट रचून त्याची हत्त्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयासमोर संशयित नगरसेवक हेमंत शेटटी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी, राकेश कोष्टी यांना प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी एम.के.पिंगळे यांनी येत्या १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पंचवटी पोलीस ठाण्यात १ आॅक्टोबर २०१५ रोजी जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उगलमुगलेचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी तपासामध्ये व्यक्त केला होता. संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांनी जालिंदरचे अपहरण करून त्याला राकेश कोष्टी, कुंदन परदेशी यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर उगलमुगलेचा मृतदेह सिन्नर-घोटी मार्गावर जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. कोष्टी, परदेशी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी खून, दरोडे, घरफोड्यांसह विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात पंचवटी परिसरातील हनुमानवाडी-क्र ांतीनगर भागात वाघ खूनप्रकरणी तुरूंगवास भोगत होते. दरम्यान, या गुन्ह्यातही त्यांचा सहभाग आढळून आला. तसेच पोलिसांनी कौलकर व कडाळे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर गुन्ह्याची उकल होत गेली आणि अपहरणापासून तर हत्त्येपर्यंत गुन्ह्यात शेट्टी यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस पथकाने वाघाडी येथे शुक्रवारी अटक केली होती. न्यायालयासमोर पोलिसांनी संशयित कोष्टी, परदेशी व शेट्टी यांना हजर केले. न्यायालयाने येत्या १ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाजपात प्रवेश ठरला होता वादग्रस्त
हेमंत शेट्टी यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढवून ते जिंकून आले होते; मात्र भाजपामध्ये शेट्टी यांचा प्रवेश गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे चांगलाच गाजला होता. शेट्टी हे राष्ट्रवादीमधून भाजपात आले होते.