मुख्य हल्लेखोर होमगार्डला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:41+5:302021-02-26T04:21:41+5:30
भूमाफियांनी मंडलिक यांच्या हत्येची सुपारी देत त्यांचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून पुढे येत आहे. या हत्याकांडातील पोलिसांच्या हाती लागलेल्या ...
भूमाफियांनी मंडलिक यांच्या हत्येची सुपारी देत त्यांचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून पुढे येत आहे. या हत्याकांडातील पोलिसांच्या हाती लागलेल्या नऊ संशयितांसह काळे यालाही येत्या १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात अद्यापही तीन मुख्य संशयित आरोपी फरार आहे. या हत्येच्या गुन्ह्यात काळे हा नवीन संशयित पोलिसांच्या हाती लागला आहे. भूमाफियांनी काळे यास मंडलिक यांचा काटा काढण्यासाठी खरेदी केले होते, असे पोलिसांनी सांगितले. काळे हा नाशिक येथे होमगार्ड असून त्याने पैशांच्या आमिषापोटी मंडलिक यांना संपविण्यासाठी ‘सुपारी’ घेतली असे पोलीस तपासातून पुढे येत आहे.
मंडलिक यांच्या हत्येप्रकरणी विशाल रमेश मंडलिक यांच्या फिर्यादीनुसार संशयित सचिन त्र्यंबक मंडलिक, जगदीश त्र्यंबक मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल जयराम मंडलिक, मुक्ता एकनाथ मोटकरी, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशिनाथ मंडलिक, दत्तात्रय काशिनाथ मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, रम्मी राजपूत, बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे आदींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सुपारी किलर गणेश काळे पोलिसांच्या हाती लागला तसेच आणखी दोघांना ताब्यात घेण्यास पोलीस यशस्वी झाले आहे; मात्र त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.
--इन्फो----
भूमाफियांचे ‘राज’ संपणार?
हत्येच्या म्होरक्याचा पोलीस शोध घेत असून तीन पथके त्यांच्या मागावर आहेत. भूमाफियांनी शहरात सर्वत्र जाळे विणले आहे. भूमाफियांच्या टोळ्या सक्रिय असून, हे शहराच्या कायदासुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरणारे असल्याने दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या हत्याकांडात वैयक्तिकपणे लक्ष घालत तपासाला दिशा देण्याबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भूमाफियांच्या समूळ उच्चाटनासाठी या गुन्ह्याचा तपास अजून कितपत पुढे जातो आणि त्यामधून काय समोर येते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. भूमाफियांनी एका वृध्दाची निर्घृणपणे हत्या करण्याचा कट रचत तो तडीस नेल्याने संताप व्यक्त होत आहे.