"मोक्का" न्यायालयाकडून पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:13+5:302021-05-22T04:14:13+5:30
---- नाशिक : संघटितपणे गुन्हेगारी कारवाया करत भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन महिन्यांपूर्वी एकाच खून करणाऱ्या टोळीसह नाशिकरोड पोलीस ...
----
नाशिक : संघटितपणे गुन्हेगारी कारवाया करत भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन महिन्यांपूर्वी एकाच खून करणाऱ्या टोळीसह नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. या गुन्ह्यात अटक संशयितांना गुरुवारी विशेष मोक्का न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या क्रूर घटनेविरुद्ध १० जानेवारी रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा यामध्ये सहभाग आढळून आला. पोलिसांनी सखोलपणे तपास करत संशयितांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात सहा संशयित गुन्हेगारांसह एका अल्पवयीन मुलास अटक केली होती. तसेच टोळीप्रमुख संशयित सुनील निंबाजी कोळे (२४, रा.आम्रपाली झोपडपट्टी) याच्या टोळीतील अन्य आठ साथीदारांसह १५ गुन्हेगारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अटक संशयितांना न्यायालयाने मोक्काअंतर्गत तपासासाठी आठ दिवसांची (२७ तारखेपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.
तसेच जुने नाशिकमधील लोणच्या उर्फ सुनील बेनेवाल याच्या टोळीने द्वारका येथे ८ फेब्रुवारी २०२१ रोजी आकाश रंजवे याचा धारधार शस्त्राने भोसकून खून केला होता. याप्रकरणी बेनेवालसह २१ संशयितांविरुद्ध खुनाचा व दंगलीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या बेनेवाल टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील अटक संशयितांना येत्या २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मोक्काअंतर्गत तपासासाठी सुनावली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला.