पोलीस पुराच्या पाण्यात..
By admin | Published: August 4, 2016 01:54 AM2016-08-04T01:54:36+5:302016-08-04T01:54:47+5:30
.बचावकार्य : पंधरा लोकांचे वाचविले प्राण
नाशिक : मंगळवारी (दि.२) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून तर पोलिसांपर्यंत सर्वच प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होत्या. पंचवटी, सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या धाडसी कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या पंधरा आबालवृद्धांना सुरक्षितपणे ‘रेस्क्यू’ केले.
पुराच्या पाण्यात अडकल्याने जिवाची भीती निर्माण झाली आणि मदतीच्या याचनेची हाक अनेकांना ऐकू आली; मात्र त्यांच्या हाकेला ओ दिला तो ‘खाकी’नेच! बंदोबस्तावरील पंचवटी पोलिसांनी थेट पुराच्या पाण्यात उड्या घेत ट्यूब, दोरखंडाचा वापर करून खांदवे सभागृहाजवळून तसेच गोदाकाठच्या आजूबाजूच्या भागांमधून एकूण बारा ते पंधरा लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले. यामध्ये चार ज्येष्ठ नागरिक, तीन मुले, पाच महिलांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगोले, हवालदार नरावडे, कोक ाटे, पवार, साळुंखे आदिंनी परिश्रम घेतले. तसेच सरकारवाडा पोलिसांनी रामवाडीकडे जाणाऱ्या घारपुरे घाटाजवळील पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेले दोन साधू, जुन्या सरकारवाड्याजवळून दोन आणि नेहरू चौकातून आठ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. नासर्डी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढल्याने सिटी सेंटर मॉल समोरील चौक ात पाण्याचा तलाव साचला होता. सुमारे पाच फुटापर्यंत पाणी येथे जमा झाले होते. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी सिग्नलवर नियोजन करत वाहतुकीसाठी रस्ता बंद केला. एका चारचाकी वाहनचालकाने वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार पाण्यात वाहू लागली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच स्थानिक तरुणांच्या मदतीने वाहनामधून चालकाला बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. एकूणच पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बंदोबस्तापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदतीचा हातही दिला. (प्रतिनिधी)