पोलिसांनो, वेगाने धावा आणि ‘क्रीम’ पोस्टिंग मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:22 AM2019-04-03T06:22:33+5:302019-04-03T06:22:44+5:30

नाशिक आयुक्तांचा अजब फिटनेस फंडा : नियुक्तीच्या निकषामुळे पोलीस चक्रावले

Police, get fast and get 'cream' posting! | पोलिसांनो, वेगाने धावा आणि ‘क्रीम’ पोस्टिंग मिळवा!

पोलिसांनो, वेगाने धावा आणि ‘क्रीम’ पोस्टिंग मिळवा!

Next

जमीर काझी

मुंबई : पोलीस दलातील विविध शाखा, विभागाच्या नियुक्त्या या संबंधितांच्या कार्यक्षमता व पात्रतेवर असाव्यात, असा सर्वसाधारण संकेत असताना, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मात्र त्यासाठी आगळाच निकष लावण्याचे ठरविले आहे. वेगाने धावा आणि नंबर पटकावून पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवा, अशी खुली आॅफर त्यांनी आयुक्तालयांतर्गत पोलिसांना दिली आहे.
पोलिसांच्या फिटनेससाठी जागरूक असलेल्या नांगरे-पाटील यांनी या वर्षीच्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी)
या शारीरिक क्षमतेवर करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतचे एक विशेष परिपत्रक सोमवारी त्यांनी जारी केले. कार्यकाळ पूर्ण झालेले आणि विनंती बदलीसाठी इच्छुक कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारापर्यंतच्या बदल्यांसाठी तिशीच्या आतील, त्यानंतर ३० ते ४० आणि ४० ते
५० असे तीन वयोगट बनविले आहेत.

तिशीच्या आतील पोलिसांना १० किलोमीटर धावावे लागेल. पहिल्या ५० जणांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली केली जाईल.
उर्वरित दोन गटांच्या शर्यतीसाठी प्रत्येकी ५ किलोमीटर अंतर असेल. पहिले २५ स्थान मिळविणाऱ्यांना इच्छुक ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. त्याचप्रमाणे, ट्रॅफिक व गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांची ‘बीएमआय’ चाचणी घेतली जाईल.
त्यामध्ये पात्र ठरणाºया संबंधित अंमलदारांना वाहतूक व गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘हे एप्रिल फुल नाही’
१ एप्रिलला परिपत्रक जारी झाल्याने सुरुवातीला काहींना ते ‘एप्रिल फुल’असावे, अशी शंका आली होती. मात्र, ते सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची धांदल उडाली. आपल्या कौशल्याचा वापर करीत समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्ह्याची उकल करणे हे प्राधान्य आहे की, फिटनेस पाहून पोस्टिंग घ्यावी, असा प्रश्न त्यांना पडल्याने, हे परिपत्रक पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘व्हायरल’ झाले.

शारीरिक क्षमतेबाबत जागृतीचा प्रयत्न
पोलिसांमध्ये आरोग्य आणि शारीरिक क्षमतेबाबत जागृती निर्माण व्हावी, या हेतूने बदलीसाठी धावण्याच्या शर्यतीचा निकष लावला आहे. त्याद्वारे एकूण १०० जणांची नियुक्ती केली जाईल, त्याशिवाय उर्वरित ७०० बदल्या या अंमलदारांची गुणवत्ता आणि अन्य क्षमतेच्या आधारावर केल्या जातील.
- विश्वास नांगरे-पाटील (नाशिक पोलीस आयुक्त).

Web Title: Police, get fast and get 'cream' posting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.