गोदापार्कवर पोलिसांचा खडा पहारा
By Admin | Published: May 7, 2017 01:27 AM2017-05-07T01:27:58+5:302017-05-07T01:28:06+5:30
अॅथलेटिक्स प्रशिक्षक काळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे अॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी सुयोजित व्हॅरिडियन गार्डन धोकादायक बनले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गोदावरीचा किनारा, गोदापार्कवर विकसित करण्यात आलेले उद्यान हे प्रेमलीला तसेच स्टंटबाजी करणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहे़ अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे आरोग्याच्या रक्षणासाठी सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणारे, मोकळी हवा अनुभवण्यासाठी येणारे, अॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी सुयोजित व्हॅरिडियन गार्डन धोकादायक बनले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर शनिवारी नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला़ या ठिकाणची टवाळखोरी व हुल्लडबाजी रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
गोदापार्कवरील निवांतपणा, मोकळी हवा व शांततेमुळे येणारी कुटुंबवत्सल मंडळी याकडे फिरकेनाशी झाली आहे़ दुचाकी वाहनांवरील स्टंटबाजी तसेच चारचाकी वाहनांवर भयानक वेग, अश्लील चाळे करणाऱ्यांमुळे आलेले विदारक स्वरूप यासाठी कारणीभूत आहे़ अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे हे शुक्रवारी सकाळी गोदापार्कमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत होते. त्यावेळी मद्यधुंद नयूश कैलास कडलग (२०, रा़ कडलग मळा, नवश्या गणपतीशेजारी, गंगापूर रोड, आनंदवली) व समीर विश्वनाथ कांबळे (२१, रा़ म्हसरूळ) या दोघांनी मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत जाब विचारायला गेलेल्या वैजनाथ काळे यांच्यावर या दोघांनी थेट चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले़