‘आयपीएल’ सामन्यावर नाशिकमध्ये बेटिंग लावणाऱ्याच्या हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By अझहर शेख | Published: March 27, 2024 03:22 PM2024-03-27T15:22:04+5:302024-03-27T15:23:38+5:30
देशभरात सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा ज्वर पहावयास मिळत आहे. या सामन्यांवर बेटिंग करत सट्टा खेळणाऱ्यांचीही संख्या वाढते.
नाशिक : देशभरात सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा ज्वर पहावयास मिळत आहे. या सामन्यांवर बेटिंग करत सट्टा खेळणाऱ्यांचीही संख्या वाढते. यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला याबाबत अलर्ट जारी केला आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून पथकाने नांदुरनाका येथून एका सट्टेबाजास बेड्या ठोकल्या. निशिकांत प्रभाकर पगार (३७,रा. सदिच्छानगर,इंदिरानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी इसमाचे नाव आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला आहे. क्रिकेटचे सामने प्रतिस्पर्धी संघांमध्ये रंगू लागले आहे. याचा आनंद एकीकडे क्रिकेटप्रेमी घेत असले तरीदेखील दुसरीकडे वेगळाच गैरफायदा सट्टेबाजांकडून घेतला जातो. ही सट्टेबाजी रोखण्यासाठी उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ व २ तसेच विशेेष पथक, गुंडाविरोधी पथक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही पथके अशा सट्टेबाजांवर लक्ष ठेवून आहेत. उपनिरिक्षक रविंद्र बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी पथक सज्ज करून कारवाईचे आदेश दिले.
छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नांदुरनाका येथे एका हॉटेलच्यापाठीमागे उघड्यावर बसून आरोपी निशिकांत चेन्नई सुपर किंग विरूद्ध गुजरात टायटन या संघांमध्ये खेळविला जाणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोबाइलवरबघत पैजा लावून सट्टा खेळत होता. पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून १८ हजाराचा बेटिंगसाठी वापरण्यात येणारा टॅब, २ मोबाइल हस्तगत केले. सरकारतर्फे अंमलदार विशाल काठे यांनी फिर्यादी होऊन त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. त्यास पुढील कारवाईसाठी आडगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.