इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By अझहर शेख | Published: March 13, 2024 04:30 PM2024-03-13T16:30:01+5:302024-03-13T16:36:39+5:30

संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी गादी बनवायची होती आणि...

Police have arrested a gang that was hunting and skinning leopards In Igatpuri | इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील एका डोंगरावर पाण्याच्या डोहाजवळ रात्रीच्यावेळी तहान भागविण्यासाठी आलेल्या बिबट्याचा ॲक्सिलेटर केबलने गळा आवळून क्रूरपणे ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिकाऱ्यांच्या टोळीने एका बाबाकडून ‘सुपारी’ घेत ही शिकार करून अमानूषपणे त्याची कातडी काढून विक्रीचा डाव आखला होता; मात्र ग्रामिण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा धाव उधळला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पाच जणांच्या टोळीला शिताफीने बुधवारी (दि.१३) बेड्या ठोकल्या.

नाशिक ग्रामिण पोलिसांनी अवैध धंद्यांविरूद्ध पुन्हा मोहीम हाती घेतली आहे. इगतपुरी तालुक्याचा भाग हा निसर्गाचे वरदान लाभलेला परिसर आहे. येथील डोंगरदऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर आढळून येतो. संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी गादी बनवायची होती आणि या गादीला बिबट्याचे कातडे लावायचे होते, यासाठी त्याने मुख्य शिकारी आरोपी नामदेव दामू पिंगळे याला त्याचा साथीदार संशयित सतोष जाखीरेमार्फत ‘सुपारी’ दिली. यानंतर आरोपी नामदेव पिंगळे (३०,रा.पिंपळगाव मोर), संतोष जाखीरे (४०,रा.मोगरा), रविंद्र अघाण (२७,रा.खैरगाव), बहिरू उर्फ भाऊसाहेब बेंडकोळी (५०,रा.वाघ्याची वाडी) आणि बाळु धोंडगे (३०,रा.धोंडगेवाडी) या सर्वांनी मिळून बिबट्याची कातडी निर्जनठिकाणी काढल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यानंतर कातडी वाळवायला ठेवून तेथून संशयित दिलिप बाबा याला ती विक्रीसाठी बुधवारी घेऊन जाणार होते. या बाबाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या गुन्ह्याचा तपास व आरोपींना आता पुढे नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हवाली करण्यात आले आहे.

पहाटे रचला सापळा! 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना याबाबत कळविले. त्यांच्या आदेशान्वये त्वरित पथक सज्ज करून बुधवारी पहाटे पथकाने पिंपळगाव मोर शिवारात सापळा रचला. घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी या पाच जणांच्या टोळीला शिताफीने अटक केली.

कातडी, कोयता जप्त 

पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता एकाकडे कोयता आढळून आला. तसेच एका गोणीमध्ये बिबट्याची कातडीदेखील लपवून तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले. कातडी, कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
 

Web Title: Police have arrested a gang that was hunting and skinning leopards In Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.