पोलीस निरीक्षकाने वाचविले महिलेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:34 AM2019-01-24T00:34:53+5:302019-01-24T00:35:11+5:30
आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले.
नाशिकरोड : आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. आगरटाकळी आदिवासी पाडा येथे राहणारी महिला पद्माबाई जालिंदर गांगुर्डे (वय ४५) यांनी बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास आगरटाकळी येथील गोदावरी-नंदिनी नदी संगम पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र याचवेळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे गाडीतून घरून पोलीस ठाण्यात जात असताना नुकतीच सदर घटना घडली होती. रायते व चव्हाण यांनी तत्काळ परिसरातील कोळी बांधवांना बोलवून त्यांच्या मदतीने नदीपात्रात उडी मारलेल्या पद्माबाई गांगुर्डे यांना लागलीच बाहेर काढून उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.