पोलिसांचा १०० क्रमांक होतोय ‘जम्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:03+5:302020-12-31T04:16:03+5:30
आगामी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नाशिककरांना आपआपल्या घरात राहून नववर्ष सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोठेही ‘नाइट ...
आगामी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नाशिककरांना आपआपल्या घरात राहून नववर्ष सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोठेही ‘नाइट कर्फ्यू’चे उल्लंघन होताना जाणवल्यास शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्याबाबतही सांगितले आहे. सर्वसामान्य नागरिक नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी ‘१००’ क्रमांक फिरवितो; मात्र या क्रमांकाच्या लाइनमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही दिवसांपासून व्यत्यय येत असल्याची तक्रार नाशिककरांकडून केली जात आहे. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षामध्ये विचारणा केली असता तेथूनही या समस्येला दुजोरा मिळाला. भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या या महत्त्वाच्या आपत्कालीन सेवेसाठी राखीव असलेल्या शंभर क्रमांकाची सेवा तातडीने सुलभ व्हावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत फटाके फोडणे, मोठे स्पीकर वाजवून संगीताच्या तालावर थिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासनाकडूनदेखील याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची प्रणाली जाहीर केली गेली आहे. कायदासुव्यवस्थेचे कोठेही पालन होत नसेल तर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये (०२५३-२३०५२३३/३४) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले.
--इन्फो--
महिला हेल्पलाइन ‘१०९१’ही बंद
महिला अत्याचार रोखण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०९१’ ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवाही विस्कळीत झाली आहे. हा क्रमांक फिरविल्यास तो जोडला जात नाही. फोन थेट ‘कट’ होतो. तसेच दुसरा क्रमांक ९७६२१००१०० हा क्रमांकदेखील आता अस्तित्वात राहिलेला नाही, अशी सूचना कानी पडते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली १०९० या टोल फ्री क्रमांकाची सेवाही बंद झाली आहे. हा क्रमांक वैध नसल्याची सूचना कानी पडते. या महत्त्वाच्या टोल फ्री क्रमांकाच्या सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
--