कंटेनरच्या धडकेत पोलीस ठार
By admin | Published: June 26, 2016 11:57 PM2016-06-26T23:57:22+5:302016-06-27T00:23:47+5:30
गरवारे पॉइंट येथील घटना
नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत शहर पोलीस वाहतूक शाखेतील कर्मचारी नाना भाऊ बागुल (५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटवर घडली़ या कंटेनरचालकास थांबण्याचा इशारा देऊनही त्याने भरधाव वेगात येऊन बागुल यांना धडक दिली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दखल केला असून, बागुल यांच्यावर सोमवारी (दि़२७) सकाळी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़
पोलीस आयुक्तालयातील शहर वाहतूक शाखेत पोलीस हवालदार नाना भाऊ बागुल (५०, रा. गंगा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद रोड, मूळ रा. चाफ्याचा पाडा, डांगसौंदाणे, ता. सटाणा) हे कार्यरत होते़ अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉइंटवर रविवारी ते नियुक्तीवर होते़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईकडून भरधाव येणाऱ्या कंटेनरला (एमएच ०४, जीसी ५८७५) थांबण्याचा इशारा केला असता कंटेनरचालकाने वेगाने उड्डाणपुलाच्या दिशेने कंटेनर नेला़ याचा जोरदार फटका बागुल यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला बसला़
या अपघातात गंभीर जखमी झालेले बागुल यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)