पोलीस पित्याकडून दोघा मुलांची गोळ्या झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:00 AM2019-06-22T01:00:21+5:302019-06-22T01:00:45+5:30
फ्लॅट नावावर करण्याच्या वादातून पोलीस शिपायाने दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी पंचवटीत घडली. दोघा मुलांवर चार गोळ्या झाडल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी संजय भोये हा स्वत: पंचवटी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी भोये यास ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पंचवटी : फ्लॅट नावावर करण्याच्या वादातून पोलीस शिपायाने दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी पंचवटीत घडली. दोघा मुलांवर चार गोळ्या झाडल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी संजय भोये हा स्वत: पंचवटी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी भोये यास ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पेठरोड नामको रुग्णालयामागे असलेल्या अश्वमेघनगर राजमंदिर को-आॅप. सोसायटीत भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पित्यानेच कौटुंबिक वादातून केलेल्या गोळीबारात अभिषेक ऊर्फ सोनू नंदकिशोर चिखलकर (२५) व शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) हे दोघे सख्खे भाऊ ठार झाले.
उपनगर पोलीस ठाण्यात बीटमार्शल म्हणून कार्यरत असलेले संजय अंबादास भोये, पत्नी मनीषा दोघे सावत्र मुले अभिषेक व शुभम यांच्या समवेत वास्तव्यास आहे. त्याचबरोबर संजय आणि मनीषा यांची मुलगा आणि मुलगीदेखील येथेच राहतात. मुलगा अभिषेक (सोनू) मर्चंट नेव्हीत कामाला होता तर शुभम हा सातपूर येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. भोये याने मनीषा यांच्याशी विवाहानंतर सावत्र मुलांसोबत राहतात. गेल्या दोन दिवसांपासून सावत्र मुले व भोये यांच्यात वाद झाले होते.
शुक्रवारी सकाळी पुन्हा वाद झाले त्यातून शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली होती. दुपारच्या सुमारास सर्व कुटुंबीय घरात असताना पुन्हा वाद झाले. त्यावेळी संतप्त झालेल्या भोये याने आपल्या ताब्यातील सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून दोघा मुलांवर चार फैरी झाडल्या. यावेळी जीव वाचवताना एकजण बेडरूममध्ये, तर दुसरा बाथरूममध्ये पळाला. मात्र सोनूच्या डोक्यात गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला, तर शुभम जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सोनू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता याठिकाणी पोलिसांना काही रिकामी काडतुसे घटनास्थळी आढळून आली. दरम्यान, दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्यानंतर संशयित भोये याने स्वत: पंचवटी पोलीस ठाण्यात शरण जाऊन घरात रोज होणाऱ्या वादातून संताप अनावर झाल्याने खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल ताब्यात घेतले असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक कैलास पाटील, सुरेश नरवाडे, संदीप शेळके, महेश साळुंके, आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
महिन्याभरापूर्वीच शुभमचा विवाह
पोलीस कर्मचारी संजय भोये याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या दोघा मुलांपैकी शुभम याचा गेल्या महिन्याभरापूर्वीच विवाह झाला होता. शुभम हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. संपत्तीमुळे कौटुंबिक वाद निर्माण होऊन अनेकदा घरात वाद होत होेते. असाच प्रकार शुक्रवारी दुपारी सुरू असताना भोये याला राग अनावर झाल्याने त्याने आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या.