सायबर क्राइमविरोधात पोलीस, वकील एकत्र लढणार: सचिन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:44 AM2021-01-09T01:44:20+5:302021-01-09T01:44:42+5:30
तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
ओझर : तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि.८) बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. फायजीच्या युगातदेखील सायबर क्राइम वाढत चालले आहे. यात अनेकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले गेले आहे. एकीकडे तंत्रज्ञान प्रगल्भ होत असताना त्यातून दररोज घडणारे विविध आर्थिक गुन्हे पोलीस प्रशासनदेखील दररोज हाताळत असतात. शेतकरी वर्गाच्या भाजीपाला, द्राक्ष व इतर फळांच्या विक्री मोबदल्यातदेखील ऑनलाइन प्रथा रूढ झालेली असून, त्याबाबत आर्थिकता जोपासने तितकेच जिकिरीचे ठरले आहे. त्याकरिता नवीन प्रणाली अंमलात आणून शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिककवच सुदृढ ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत राहील, असेही पाटील यांनी सांगितले. याबाबत पुढील काळात पोलीस दल व जिल्हा वकील संघाकडून एकत्रितपणे विविध प्रकारचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ऑनलाइन फसवणुकीवर प्रभावी निर्बंध आणण्यासाठी वकील व जिल्हा पोलीस विभाग खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.
राज्यात पहिला उपक्रम
आजपावेतो ऑनलाइन फसवणुकीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असताना न्यायप्रक्रियेत त्यास विलंब होत असतो. त्यावर हा तोडगा प्रभावी ठरणार आहे. पोलीस व वकील संघाचे दोन्ही प्रमुख एकत्र येऊन प्रक्रिया गतिमान करण्यास हातभार लावणार असल्याने राज्यात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.