महिला एपीआयसह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:13 AM2021-03-20T01:13:23+5:302021-03-20T01:14:14+5:30
पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात एका मालवाहतूकदार व्यावसायिकाने दोन्ही संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयितांकडून फिर्यादीकडे नाशिक मालेगाव महामार्गावर चालणाऱ्या ३५ वाहनांची अडवणूक न करता सर्व वाहने सुरळीत चालू देण्यासाठी संशयित सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश भास्कर सानप यांनी ८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे वाहतूकदाराने तक्रार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) सापळापूर्व पडताळणी केली.
या पडताळणी दरम्यान एपीआय वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश सानप यांनी वाहतूकदाराकडून तडजोडीअंती ८ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.