भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा सत्कार करण्यास गेलेल्या ‘सुकाणू’चे पदाधिकारी नाशिक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:16 PM2017-11-25T14:16:59+5:302017-11-25T14:29:08+5:30
अतिथी ‘जावई’ असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे शेतकरी आपले कर्तव्य समजतो’ असे सुकाणूने प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. दानवे यांनी शेतक-यांना ‘साले’ असे संबोधल्याच्या वक्तव्यावरून राज्यभर वादंग उठले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून सुकाणूने त्यांना ‘दाजी’ संबोधत सत्कार आयोजित केला होता.
नाशिक : शेतक-यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शनिवारी नाशिकमध्ये असून त्यांच्या ‘त्या’ खास शैलीत स्वागतासाठी गेलेल्या ‘सुकाणू’च्या पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी नाशकात आलेल्या रावसाहेब दानवे यांचा संस्कृतीनुसार ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे शेतक-यांच्या ‘सुकाणू’ समितीने शासकिय विश्रामगृहावर पारंपरिक सत्कार करण्याचा मनसुबा ठेवला होता. यानुसार समितीचे पदाधिकारी विश्रामगृहावर पोहोचले.
अतिथी ‘जावई’ असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे शेतकरी आपले कर्तव्य समजतो’ असे सुकाणूने प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. दानवे यांनी शेतक-यांना ‘साले’ असे संबोधल्याच्या वक्तव्यावरून राज्यभर वादंग उठले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून सुकाणूने त्यांना ‘दाजी’ संबोधत सत्कार आयोजित केला होता. सुकाणूच्या सत्काराचा मनसुबा पोलिसांनी मात्र उधळला. विश्रामगृहावर पोहचलेल्या सुकाणूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी भाजप सरकारविरोधी घोेषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्यानंतर पोलिसांनी मात्र त्यांना वाहनात डांबले. वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून दानवे यांचे औंक्षण व काळी शाल, काळा पोशाख असे सत्कारामध्ये दानवे यांना देण्यासाठी सुकाणूचे कार्यकर्ते विश्रामगृहावर पोहचले होते.