पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्टवादीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:58 PM2019-01-22T23:58:36+5:302019-01-23T00:07:53+5:30
पोलीस भरतीसंदर्भात नव्याने येऊ घातलेल्या नियमांना विरोध दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले.
नाशिक : पोलीस भरतीसंदर्भात नव्याने येऊ घातलेल्या नियमांना विरोध दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पोलीस भरतीसंबंधात शासन निर्णय काढलेला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न धुळीस मिळणारा आहे. या शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा प्रथम घेणार असून, त्यानुसार मेरीट लावून मग उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
त्यामुळे सदरचा निर्णय त्वरित मागे घेऊन जुन्याच पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड. सुरेश आव्हाड यांनी दिला आहे. यावेळी नासीर पठाण, हाजी मोहिय्योद्दिन शेख, बाळासाहेब जाधव, गणेश धोत्रे, अॅड. श्याम तावरे, अॅड. योगेश जगताप, पांडुरंग काकड, प्रमोदराव मंडलिक, नितीन चव्हाणके, गणेश विश्वकर्मा, रेखाताई शेलार आदी उपस्थित होते.
शारीरिक चाचणीतून पुलअप्स, लांबउडी यांसारखे प्रकार वगळण्यात आले आहेत. १०० गुणांची असणारी शारीरिक चाचणी फक्त ५० गुणांची करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून, यामुळे ग्रामीण भागातील मुलांवर मोठ्याप्रमाणात अन्याय होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नोकरीचे प्रमाण घटणार असल्याने याचा परिणाम शेतकरी व ग्रामीण व्यवस्थेवर होणार आहे.