पोलीस पाटलांना मानधन मिळेना, ६ महिन्यांपासून नुसती प्रतिक्षाच
By संदीप भालेराव | Published: September 3, 2022 04:28 PM2022-09-03T16:28:08+5:302022-09-03T16:29:02+5:30
मागणी दुर्लक्षित : निधी नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे गाऱ्हाणे
नाशिक : पोलिसांचे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस पाटलांना सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावरच न्याय मागण्याची वेळ आली आहे. निधी प्राप्त झाला नसल्याच्या कारणावरून महिनोन महिने मानधन दिले जात नसल्याने पेालीस पाटलांची गैरसोय होत आहे. आता तर सणासुदीत मानधन नसल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजी पसरली आहे. या संदर्भात अपर जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस पाटील संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गाव खेड्यात कामकाज करणाऱ्या पोलीस पाटील यांची संख्या हजाराच्यापुढे आहे. पंधरा तालुक्यांतील गावखेड्यांमध्ये पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटलांना शासनाकडून दरमहा साडेसहा हजार रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र मानधन हे त्या-त्या महिन्यात कधीच मिळत नाही, तर दोन ते तीन महिन्यांचे मानधन एकदम दिले जाते. जितका विलंब मानधन काढण्यास होतो तितके महिने पोलीस पाटलांना वाट पाहावी लागते. असे निवेदनात म्हटले आहे.
पोलीस पाटील चोवीस तास उपलब्ध असल्याने मानधन १५ हजार रुपये केले पाहिजे. सध्या केवळ साडेसहा हजार रुपये दिले जाते. पोलीस पाटील यांना प्रवास भत्ता मिळत नाही. पोलिसांच्या कोणत्याही सवलती नाहीत, कोरोना काळातील अतिरिक्त मानधनही अजून मिळाले नाही. शासनाने या मागण्यांचा विचार करावा.
- कैलास बच्छाव, पोलीस पाटील संघटना, राज्य उपाध्यक्ष